निवृत्त बँक अधिकार्यांना गंडा घालणार्या सायबर हस्तकांना अटक
मनी लॉड्रिंगप्रकरणी अटकेची भीती दाखवून 50 लाखांना गंडा घातला
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
29 ऑक्टोंबर 2025
मुंबई, – मनी लॉड्रिंगच्या गुन्ह्यांत सहभाग उघडकीस आल्याची बतावणी करुन एका निवृत्त वयोवृद्ध बँक अधिकार्यासह त्यांच्या पत्नीची चौकशी करुन त्यांच्यावर अटकेची भीती दाखवून 50 लाखांना गंडा घालणार्या सायबर गुन्हेगाराच्या टोळीतील दोन हस्तकांना अटक करण्यात उत्तर प्रादेशिक विभागाच्या सायबर सेल पोलिसांना यश आले आहे. रवी आनंदा आंबोरे आणि विश्पाल चंद्रकांत जाधव अशी या दोघांची नावे आहेत. त्यांनी उघडलेल्या बेनिफिशरी बँक खात्यात 29 लाख 50 हजार रुपये जमा झाल्याचे तपासात उघडकीस आले आहे. ते दोघेही फसवणुकीसाठी सायबर ठगांना मदत करत होते, इतकेच नव्हे तर त्यांच्या बँक खात्यात देशभरातील सातहून ऑनलाईन फसवणुकीच्या गुन्ह्यांतील रक्कम ट्रान्स्फर झाल्याचे निष्पन्न झाले आहे. फसवणुकीच्या याच गुन्ह्यांत ते दोघेही सध्या पोलीस कोठडीत असून त्यांची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.
यातील वयोवृद्ध तक्रारदार उत्तर मुंबईत त्यांच्या पत्नीसोबत राहतात. ते एका बँकेतून निवृत्त झाले आहेत. सप्टेंबर महिन्यांत ते त्यांच्या घरी होते. यावेळी त्यांना एका अज्ञात व्यक्तीने तो पोलीस अधिकारी असल्याचे सांगून सध्या नाशिक पोलीस दलात कामाला असल्याचे सांगितले. त्यांच्या आधारकार्ड, पॅनकार्डवरुन एका बँकेत खाते उघडण्यात आले असून त्यात मनी लॉड्रिंगशी संबंधित पैसे ट्रान्स्फर झाले आहेत. या पैशांचा अवैध कारवायासाठी वापर झाला आहे. त्यामुळे त्यांची चौकशी होणार आहे. या चौकशीनंतर त्यांच्यासह त्यांच्या पत्नीवर अटकेची कारवाई होणार आहे अशी भीती दाखविली होती. त्यांचा विश्वास बसावा म्हणून या व्यक्तीने त्यांना त्यांचे आधारकार्ड, एफआयआर कॉपी, राष्ट्रीय तपास यंत्रणाच्या (एनआयए) आयपीएस अधिकार्यांचे ओळखपत्रासह इतर दस्तावेज व्हॉटअप पाठविले होते. ते दस्तावेज पाहिल्यानंतर त्यांना धक्काच बसला होता.
अटकेची भीती दाखवून त्याने त्यांची सलग तीन दिवस व्हिडीओ कॉलद्वारे चौकशी केली. त्यांच्यावर डिजीटल अटकेची कारवाई करण्यात आली आहे, त्यामुळे चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांना कोणालाही संपर्क साधता येणार नाही, या चौकशीची माहिती सांगता येणार नाही. त्यांनी दिलेल्या नियमांचे उल्लघंन केल्यास त्यांच्या घरी पोलिसांना पाठवून त्यांना अटक केली जाईल अशी धमकी दिली होती. त्यामुळे त्यांनी या चौकशीबाबत कोणालाही काहीही सांगितले नव्हते. चौकशीदरम्यान त्याने त्यांना वेगवेगळ्या बँक खात्यात पैसे ट्रान्स्फर करण्यास प्रवृत्त केले होते. चौकशी पूर्ण झाल्यावर, या गुन्ह्यांत त्यांचा सहभाग उघडकीस न आल्यास ही रक्कम त्यांच्या बँक खात्यात ट्रान्स्फर केली जाणार असे सांगितले. त्यामुळे त्यांनी कुठलीही शहानिशा न करता त्याला 50 लाख 50 हजार 900 रुपये पाठवून दिले होते. ही रक्कम ट्रान्स्फर केल्यानंतर त्यांना फसवणुकीचा हा प्रकार निदर्शनास आला होता. त्यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तोतयागिरी करुन पैशांचा अपहार करुन फसवणुक करणे या भारतीय न्याय सहिता आणि आयटीच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता.
गुन्हा दाखल होताच पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त लखमी गौतम अतिरिक्त पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त पुरुषोत्तम कराड, सहाय्यक पोलीस आयुक्त इरफान शेख, प्रभारी पोलीस निरीक्षक किरण आहेर यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक अमोल कांबळे, सहाय्यक फौजदार मोरे, पोलीस शिपाई मेघे, पोलीस हवालदार गवळी यांनी तपास सुरु केला होता. तपासात फसवणुकीची सुमारे 29 लाखांची रक्कम काही बेनिफिशरी बँक खात्यात जमा झाली होती. या बँक खातेदाराचा शोध घेताना ते उल्हासनगर परिसरात राहत असल्याचे उघडकीस आले. त्यानंतर या पथकाने रवी आंबोरे आणि विश्वपाल जाधव या दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.
चौकशीत त्यांनी स्वतची वैयक्तिक माहिती सादर करुन बँकेत खाती उघडली होती. या बँक खात्याची माहिती सायबर गुन्ह्यांतील ठगांना दिली होती. त्यानंतर याच बँक खात्यात फसवणुकीची रक्कम ट्रान्स्फर केली जात होती. फसवणुकीसाठी या दोघांनी सायबर ठगांना बँक खाती पुरविले होते, तसेच खात्यात जमा झालेली रक्कम त्यांना ट्रान्स्फर केले होते. याकामी या दोघांनाही ठराविक रक्कमेचे कमिशन मिळाले होते. तपासात आलेल्या या माहितीनंतर या दोघांवर पोलिसांनी अटकेची कारवाई केली होती. अटकेनंतर त्यांना बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.
नागरिकांना आवाहन करण्यात येते की, डिजीटल अरेस्ट प्रकारच्या गुन्ह्यांपासून वाचण्यासाठी नागरिकांनी खालीलप्रमाणे काळजी घ्यावी
1) पोलीस, सीबीआय, ईडी, आरबीआय किंवा इतर कोणतीही सरकारी संस्था डिजीटल अटक करत नाही.
2) भारताच्या कोणत्याही कायद्यांत डिजीटल अटकेची तरतूद नाही.
3) अज्ञात व्यक्तीकडून कधीही व्हिडीओ कॉल स्विकारु नका.
4) जर तुम्हाला अटक किंवा तपासाबाबत कोणताही कॉल आला तर जवळच्या पोलीस ठाण्याला भेट द्या किंवा सायबर हेल्पलाईन क्रमांक 1930 वर कॉल करा किंवा cybercrime.gov,sancharsaathi.gov.in वर तक्रार करावी.