मनी लॉड्रिंगच्या गुन्ह्यांत अटकेची भीती दाखवून फसवणुक
महिलेला 32 लाखांना गंडा घालणार्या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
20 नोव्हेंबर 2025
मुंबई, – मनी लॉड्रिंगच्या गुन्ह्यांत अटकेची भीती दाखवून एका 72 वर्षांच्या वयोवृद्ध महिलेची तीनजणांच्या टोळीने सुमारे 32 लाखांची फसवणुक केल्याचा प्रकार मुलुंड परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी तिघांविरुद्ध पूर्व प्रादेशिक विभागाच्या सायबर सेल पोलिसांनी तोतयागिरी करुन फसवणुक करणे आणि आयटीच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.
प्रिया विजय खट्टर ही महिला ही मुलुंड येथे तिच्या पतीसोबत राहते. तिच्या पतीचा स्वतचा व्यवसाय आहे. 11 नोव्हेंबरला तिच्या पतीला संदीप रॉय नावाच्या एका व्यक्तीने कॉल करुन तो कुलाबा येथील गुन्हे शाखेतून बोलत असल्याचे सांगितले. त्यांच्या बँक खात्यात अडीच कोटीचे मनी लॉड्रिंगचा व्यवहार झाला आहे. त्यापैकी दहा टक्के कमिशनची 25 लाख रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा झाले आहे. यावेळी त्यांनी त्यांचे संबंधित बँक खाते नसल्याचे सांगूनही तो त्यांची चौकशी करत होता. या चौकशीत त्यांनी ते दोघेही मुलुंड येथे राहत असून एक मुलगी नेदरलँड तर दुसरी कॅनडा येथे राहत असल्याचे सांगितले.
त्यांच्याविरुद्ध चौकशी सुरु असल्याने याबाबत कोणालाही काहीही सांगू नका. नाहीतर त्यांना त्यांच्या घरातून अटक केली जाईल अशी धमकी दिली. त्यानंतर दुसर्या दिवशी त्यांच्याशी पोलीस गणवेश घातलेल्या दिलीप जैस्वाल नावाच्या व्यक्तीने व्हिडीओ कॉलद्वारे चौकशी सुरु केली होती. त्याने त्यांना सिनिअर सिटीझन असल्याने त्यांना अटक करणार नाही, मात्र ते त्यांच्या घरी डिजीटल अरेस्ट असतील. त्यामुळे पोलिसांना सहकार्य करा असे सांगून त्यांच्या बँक खात्याची माहिती काढण्यास सुरुवात केली. यावेळी त्यांनी त्यांच्या बँक खात्यात 37 लाख रुपये कॅश तर लॉकरमध्ये काही सोन्याचे दागिने असल्याचे सांगितले. त्यानंतर त्याने तपासात सहकार्य करण्यासाठी त्यांच्याकडे 32 लाख 80 हजाराची मागणी केली होती. त्यासाठी त्याने एका बँक खात्याची डिटेल्स दिली होती.
अटकेच्या भीतीने ते बँकेत गेले आणि त्यांनी आरटीजीएसद्वारे संबंधित बँक खात्यात 32 लाख 80 हजार रुपयांची कॅश ट्रान्स्फर केली होती. पैसे ट्रान्स्फर केल्याची स्लिप त्यांनी त्यांना व्हॉटअपवर पाठविली होती. 14 नोव्हेंबरला त्यांच्या जावयाचा त्यांना कॉल आला होता. यावेळी त्यांनी घडलेला प्रकार त्यांना सांगितला. यावेळी त्याने त्यांना त्यांची सायबर ठगांकडून फसवणुक झाल्याचे सांगून पोलिसांत तक्रार करण्याचा सल्ला दिला. डिजीटल अरेस्ट असा कुठलाही प्रकार नसून पोलीस ऑनलाईन चौकशी करत नाही. त्यांची सायबर ठगांनी फसवणुक केली आहे.
हा प्रकार लक्षात येताच त्यांनी सायबर सेलच्या पूर्व प्रादेशिक विभागात घडलेला प्रकार सांगून संबंधित तिन्ही सायबर ठगाविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर पोलिसांनी तिघांविरुद्ध भारतीय न्याय सहिता आणि आयटीच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून ज्या बँक खात्यात ही रक्कम आरटीजीएसद्वारे ट्रान्स्फर झाली होती. त्या बँक खात्यासह खातेदारांची माहिती काढली जात आहे.