पाण्याच्या टबमध्ये बुडून चार वर्षांच्या मुलीचा मृत्यू
एडीआरची नोंद करुन दिडोंशी पोलिसांकडून तपास सुरु
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
22 ऑगस्ट 2025
मुंबई, – पाण्याच्या टबमध्ये बुडून एका चार वर्षांच्या अल्पवयीन मुलीचा मृत्यू झाल्याची घटना गोरेगाव परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी दिडोंशी पोलिसांनी एडीआरची नोंद करुन तपास सुरु केला आहे. मृत मुलीच्या पालकांची पोलिसांनी जबानी नोंदवून घेतली असून या घटनेमागे त्यांनी कोणावरही संशय व्यक्त केला नाही किंवा कोणाविरुद्ध तक्रार केली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. चार वर्षांच्या मुलीच्या अपघाती मृत्यूने परिसरात प्रचंड शोककळा पसरली होती.
मृत मुलगी ही तिच्या पालकांसोबत गोरेगाव येथील राजीव गांधीनगरात राहत होती. तिचे वडिल एका खाजगी कंपनीत कामाला तर आई गृहिणी आहे. ती जन्मापासून मतिमंद असून तिला नीट चालता-फिरता येत नव्हते. तिला बोलताही येत नव्हते. लहानपणापासून तिला फिटचा त्रास होता. त्यामुळे तिच्यावर चेंबूरच्या न्यूरॉलॉजिस्टमध्ये नियमित उपचार सुरु होते. सोमवारी 18 ऑगस्टला त्यांच्या घरी पूजा होती. त्यामुळे त्यांचे सर्व नातेवाईक, मित्रमंडळी त्यांच्या घरी आले होते. पूजेमुळे त्यांच्यासह इतर कुटुंबियांना झोपण्यासाठी उशिर झाला होता. यावेळी ती तिच्या आईसोबत झोपली होती.
दुसर्या दिवशी सकाळी साडेदहा वाजता तिच्या आईला जाग आली, त्यावेळी तिला ती कुठेच दिसली नाही. त्यामुळे तिने तिचा घरात सर्वत्र शोध घेतला. यावेळी ती बाथरुमच्या अर्ध्या पाण्याने भरलेल्या टबमध्ये डोके आत आणि पाय वर अशा अवस्थेत दिसून आली. या प्रकाराने तिला धक्काच बसला होता. त्यामुळे तिने तिला टबमधून बाहेर काढून जवळच असलेल्या एम. व्ही देसाई हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तिथे तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले. ही माहिती मिळताच दिडोंशी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी तिच्या वडिलांची पोलिसांनी जबानी नोंदवून घेतली होती.
या जबानीतून हा प्रकार उघडकीस आला. त्यांनी कोणावरही संशय व्यक्त केला नाही किंवा तक्रार केली नव्हती. त्यामुळे त्यांच्या जबानीनंतर पोलिसांनी एडीआरची नोंद केली होती. तिचा मृतदेह नंतर गोरेगाव येथील सिद्धार्थ हॉस्पिटलमध्ये शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला होता. त्याचा अहवाल अद्याप पोलिसांना प्राप्त झालेला नाही. शवविच्छेदनानंतर तिचा मृतदेह तिच्या पालकांकडे सोपविण्यात आला. या संपूर्ण घटनेची दिडोंशी पोलिसांकडून चौकशी सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.