विविध कामासाठी घेतलेल्या एक कोटीचा अपहार करुन फसवणुक
मुख्य आरोपीच्या सहकार्याला अटक तर इतरांचा शोध सुरु
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२८ जुलै २०२४
मुंबई, – बांधकामाशी संबंधित विविध कामासाठी सातजणांकडून घेतलेल्या सुमारे एक कोटीचा अपहार करुन फसवणुक करणार्या कटातील मुख्य आरोपीच्या एका सहकार्याला दिडोंशी पोलिसांनी अटक केली. अस्लम इब्राहिम शेख असे या आरोपीचे नाव असून अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले. या गुन्ह्यांतील मुख्य आरोपी समर इस्माईल शहा व त्याचे इतर सहकारी अद्याप फरार असून त्यांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.
निलेश रामराव म्हामुणकर हे गोरेगाव येथील नागरी निवारा परिषद परिसरात त्यांच्या कुटुंबियांसोबत राहतात. सध्या ते एका खाजगी विमान कंपनीत कार्गो अधिकारी म्हणून कामाला आहेत. जानेवारी २०२३ रोजी त्यांची समर इस्माईल शहाशी ओळख झाली होती. या ओळखीत समरने तो बांधकाम व्यावसायिक असून घराचे इंटेरिअर, बांधकाम करतो असे सागितले होते. त्यांची रायगडच्या महाड, दहिवड गावात वडिलोपार्जित जागा होती, या जागेवर त्यांना घराचे काम करायचे होते. याच संदर्भात समरची सविस्तर चर्चा करण्यासाठी ते त्याच्या गोरेगाव येथील कार्यालयात गेले होते. यावेळी त्यांनी समरला त्यांच्या गावाच्या मोकळ्या प्लाटवर दोन मजली इमारत बांधकाम करायचे आहे असे सांगून त्याच्याकडून इमारतीचे डिझाईन आणि कोटेशन देण्यास सांगितले होते. काही दिवसांनी त्याने त्यांना ३१ लाख ५० हजार रुपयांचे कोटेशन दिले होते. २५ फेब्रुवारी निलेश म्हामुणकर हे समरसह इतरासोबत त्यांच्या गावी व्हिजीटसाठी गेले होते. त्याच रात्री समरने त्यांच्याशी काही लोकांची भेट घडवून आणली. ते त्यांच्या घराचे बांधकाम पूर्ण करतील असे सांगितले. मार्च महिन्यांत त्यांच्या इमारतीच्या बांधकामसंदर्भात एक करार झाला होता. मार्च महिन्यांत गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर घराच्या बांधकामाचे भूमिपूजन झाले होते. यावेळी समर शहा, त्याची पत्नी सानिया, मुलगा असद आणि ऍक्युरेट ट्रेडचा भागीदार अस्लम शेख असे सर्वजण उपस्थित होते. २६ मार्चला समर हा त्यांच्या घरी आला होता. त्याने त्याच्या आईला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले असून त्याला पैशांची गरज आहे असे सांगतले. त्यामुळे त्यांनी त्याला दहा लाख रुपये दिले होते. त्यापूर्वी त्यांनी घराच्या बांधकामासाठी १२ लाख ८७ हजार ५०० रुपये दिले होते.
एप्रिल महिन्यांत ते गावी गेले होते. यावेळी त्यांना घराच्या बांधकाम साईटवर कोणीही कामगार काम करताना दिसून आले. त्यांनी सुपरवायझर शाहीाबज मुल्लाजीकडे विचारणा केली असता तो त्यांना विविध कारण सांगून टाळण्याचा प्रयत्न करत होता. त्यामुळे त्याने समरला कॉल केला असता दिलेल्या मुदतीत इमारतीचे बांधकाम पूर्ण होईल असे सांगितले. यावेळी त्याने आईच्या आजारपणाचे कारण पुढे करुन काम थांबल्याची कबुली दिली. त्यानंतर दोन महिने उलटूनही त्याने बांधकाम सुरु नव्हते. याच दरम्यान त्यांना समर हा पळून गेला असून त्याने दोन महिन्यांचा कामगाराचा पगार दिला नव्हता. मटेरियल सप्लायर्सचे पैसे दिले नव्हते. वारंवार संपर्क साधूनही समरचा मोबाईल बंद येत होता. त्यामुळे त्यांनी दिडोंशी पोलिसांना हा प्रकार सांगितला. यावेळी पोलिसांकडून त्यांना समर शहाने त्यांच्यासह इतर सातजणांची अशाच प्रकारे फसवणुक केली. सिमा कवलनैन भगतकडून १४ लाख ४० हजार, महेश सिताराम मयेकरकडून ६ लाख ८५ हजार, अखिलेश जगदीश रायकडून २३ लाख २५ हजार, इमाम हुसैन अन्सारीकडून ३८ लाख ८१ हजार, मनिष रमेशचंद्र पांडेकडून २ लाख ६२ हजार आणि फैज अहमद अजीज अहमद शेखकडून ४ लाख असे १ कोटी २ लाख ८० हजार ५०० हजार विविध काम करतो असे सांगून घेतले होते. मात्र कोणाचेही काम पूर्ण केले नाही. त्यांच्याकडून घेतलेल्या पैशांचा वैयक्तिक कारणासाठी वापर करुन सातजणांची फसवणुक केली होती.
हा प्रकार उघडकीस येताच निलेश म्हाणुकर यांनी समर शहासह इतर आरोपीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर या आरोपीविरुद्ध पोलिसांनी ४०६, ४२०, ३४ भादवी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी पळून गेलेल्या आरोपींच्या अटकेसाठी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही शोधमोहीम सुरु असताना ऍक्युरेट ट्रेडचा भागीदार अस्लम शेख याला पोलिसांनी अटक केली होती. याच गुन्ह्यांत तो सध्या न्यायालयीन कोठडीत असल्याचे पोलिसांनी सांगितले. या गुन्ह्यांत समर शहासह इतर आरोपी फरार असल्याने त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. तपासात समरने त्याच्या मित्राच्या नावाने गोरेगाव येथे एक भाड्याने घर घेतले होते, तिथे त्याने स्वतचे कार्यालय सुरु केले होते. बांधकामाशी संबंधित काम करतो असे सांगून त्याने त्यांच्याकडे पैसे घेतले, या पैशांचा अपहार करुन समरसह इतर सर्व आरोपी पळून गेल्याचे उघडकीस आले.