व्यवसायात गुंतवणुकीच्या आमिषाने ८० लाखांची फसवणुक
आठ महिन्यांचे भाडे न देता पैशांचा अपहार केल्याचा आरोप
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
७ फेब्रुवारी २०२५
मुंबई, – नवीन व्यवहार सुरु असून पार्टनरशीपची ऑफर देत गुंतवणुक करण्यास प्रवृत्त करुन एका व्यावसायिकाची सुमारे ८० लाखांची फसवणुक झाल्याचा प्रकार मालाड परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी संदीप बळवंत नाईक या आरोपी व्यावसायिकाविरुद्ध दिडोंशी पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. त्याच्यावर कंपनीसाठी दिलेल्या चार डंपरचे आठ महिन्यांचे भाडे न देता पैशांचा अपहार केल्याचा आरोप आहे. याच गुन्ह्यांत संदीपची लवकरच पोलिसांकडून चौकशी होणार आहे.
मधुुवेंद्र प्रकाशचंद्र राय हे मालाड येथे राहत असून तयंची एस. आर कन्स्ट्रक्शन नावाची एक खाजगी सरकार मान्य कंपनी आहे. त्यांचा पेट्रोलियम पदार्थ विक्रीचा व्यवसाय आहे. तीन वर्षांपूवीर्र् त्यांची त्यांच्या नातेवाईकाच्या माध्यमातून संदीप नाईकशी ओळख झाली होती. तो डोबिवली येथे रेल्वे कॉरीडॉर बनविण्याचे काम करतो. त्याला टाटा प्रोजेक्ट लिमिटेड कंपनीकडून एक कंत्राट मिळाले असून त्याला पाच डंपरची गरज आहे. त्यामुळे त्यांनी त्याच्यासोबत पार्टनरशीपमध्ये व्यवसाय सुरु करण्याचा सल्ला दिला होता. त्यामुळे त्यांनी संदीपसोबत व्यवसायानिमित्त सविस्तर चर्चा केली होती. या चर्चेनंतर त्यांच्यात एक करार झाला होता. या करानंतर त्यांनी बोरिवलीतील एका खाजगी बँकेतून १ कोटी ९४ लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. त्यातून त्यांनी चार डंपर खरेदी करुन ते चारही डंपर संदीप नाईक याच्या डोबिवली येथील कामाच्या साईटवर पाठवून दिले होते.
ठरल्याप्रमाणे संदीपला त्यांना दरमाह ११ लाख ८० हजार आणि १८ टक्के जीएसटी रक्कम देणे बंधनकारक होते. तीन महिने उलटून गेल्यानंतर त्याने चौथ्या महिन्यांत त्याला ४७ लाख २० हजार रुपयांचे बिल पाठविले होते. मात्र त्याने त्यांना पेमेंट केले नाही. त्यामुळे त्यांनी संदीपच्या कामाच्या साईटवर जाऊन डंपरची पाहणी केली होती. यावेळी त्यांना चारही डंपरचे टायर आणि बॅटरी चोरीस गेल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांनी पनवेल पोलिसांत तक्रार केली होती. याबाबत विचारणा केल्यानंतर संदीपकडून त्यांना काही प्रतिसाद मिळाला नाही. संदीपचा व्यवहार पसंद न पडल्याने त्यांनी त्याच्यासोबतचा करार रद्द करुन त्यांनी त्याच्या देणे असलेल्या पैशांची मागणी सुरु केली होती. मात्र तो विविध कारण सांगून त्यांना टाळण्याचा प्रयत्न करत होता.
पार्टनरशीपमध्ये व्यवसाय सुरु करण्याची ऑफर देऊन संदीपने बँकेतून कर्ज घेऊन चार डंपरचे एप्रिल ते डिसेंबर २०२१ या आठ महिन्यांचे ८० लाख ५३ हजार ४१८ रुपयांचे भाडे न देता त्यांची फसवणुक केली होती. हा प्रकार उघडकीस येताच त्यांनी दिडोंशी पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर संदीप नाईक याच्याविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून त्याची लवकरच पोलिसांकडून चौकशी होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.