वाळू सप्लायचे कंत्राट मिळाल्याची बतावणी करुन फसवणुक
व्यावसायिकाला एक कोटींना गंडा घातल्याप्रकरणी गुन्हा दाखल
व्यावसायिकाला एक कोटींना गंड घातल्याप्रकरणी गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१३ फेब्रुवारी २०२५
मुंबई, – उत्तरप्रदेश सरकारकडून कोट्यवधी रुपयांचे वाळू सप्लायचे शासकीय कंत्राट मिळाल्याची बतावणी करुन गुंतवणुकीच्या नावाने एका वयोवृद्ध व्यावसायिकाची सुमारे एक कोटीची फसवणुक झाल्याचा प्रकार मालाड परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी दिपक शर्मा व्यावसायिकाविरुद्ध दिडोंशी पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या गुनह्यांत त्याची लवकरच पोलिसांकडून चौकशी करुन जबानी नोंदविण्यात येणार आहे.
६७ वर्षाचे वयोवृद्ध तक्रारदार प्रकाशचंद्र अंबिका राय हे व्यवसायिक असून ते मालाड येथे त्यांच्या कुटुंबियासोबत राहतात. दिपक शर्मा हा त्यांचा परिचित असून त्याची अमरावती येथे नॅचरल रिसॉसेस एलएलपी नावाची एक कंपनी आहे. या कंपनीला उत्तरप्रदेश सरकारकडून वाळू सप्लायचे एक कंत्राट मिळाले आहे. त्यासाठी त्यांना आर्थिक मदतीची गरज होती. त्यामुळे त्यांनी प्रकाशचंद्र राय यांची मालाडच्या वृंदावन सीएचएसमधील कार्यालयात भेट घेतली होती. या भेटीदरम्यान त्याने त्यांना वाळू सप्लायची माहिती देऊन त्याला त्याच्या व्यवसायात गुंतवणुक करण्याची विनंती केली होती. या गुंतवणुकीवर त्यांना तीन टक्के व्याजदराने परतावा देण्याचे आश्वासन दिले होते. दिपक शर्मा हा त्यांचा परिचित व्यावसायिक असल्याने त्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवून त्याला आर्थिक मदत करण्याचे ठरविले होते.
फेब्रुवारी २०१९ ते मार्च २०२२ या कालावधीत त्यांनी त्याला गुंतवणुक म्हणून एक कोटी रुपये दिले होते. त्यापैकी ५९ लाख २६ हजार कॅश तर उर्वरित रक्कम ऑनलाईन स्वरुपात ट्रान्स्फर केली होती. याबाबत त्यांच्यात एक व्यावसायिक करार झाला होता. मात्र दिलेल्या मुदतीत त्याने त्यांना व्याजाची रक्कम दिली नाही. विचारणा केल्यानंतर तो त्यांना सतत विविध कारण सांगून टाळण्याचा प्रयत्न करत होता. याबाबत त्यांनी शहानिशा केली असता दिपक शर्माला उत्तरप्रदेश सरकारकडून कुठलेही शासकीय वाळे सप्लायचे कंत्राट मिळाले नसल्याचे समजले. हा प्रकार समजताच त्यांनी त्याच्यासोबत करार रद्द करुन त्यांच्या पैशांची मागणी सुरु केली होती.
मात्र तीन वर्ष उलटूनही त्याने त्यांना पैसे दिले नाही. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच प्रकाशचंद्र राय यांनी दिपक शर्मा याच्याविरुद्ध दिडोंशी पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. याच गुन्ह्यांत दिपकला लवकरच चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजाविण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.