24 टक्के परताव्याच्या आमिषाने व्यावसायिकाची फसवणुक
2.79 कोटींना गंडा घातल्याप्रकणी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
11 एपिल 2025
मुंबई, – टुर्स अॅण्ड ट्रॅव्हेल्स कंपनीत गुंतवणुक केल्यास 24 टक्के परताव्याचे गाजर दाखवून एका व्यावसायिकाला त्याच्या परिचित व्यावसायिकाने 2 कोटी 79 लाखांना गंडा घातल्याचा प्रकार गोरेगाव परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी फेनिल जयेशभाई मेहता या आरोपी व्यावसायिकाविरुद्ध दिडोंशी पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. फेनिलने अशाच प्रकारे इतरांना आकर्षक परताव्याचे आमिष दाखवून गंडा घातला आहे का याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.
निशांत रमाकांत हरलालका हे व्यावसायिक असून ते दादरच्या प्रभादेवी परिसरात राहतात. त्यांचा वडिलोपार्जित अत्तराचा व्यवसाय आहे. जुलै 2021 रोजी त्यांची फेनिलशी ओळख झाली होती. या ओळखीदरम्यान त्याने त्यांना तो सायन, केईएम हॉस्पिटलमध्ये जनरल फिजिशियन म्हणून काम करतो असे सांगितले होते. त्याने त्यांच्या माटुंगा येथील फ्लॅट भाड्याने देण्याची विनंती केली होती. त्यामुळे त्यांनी त्यांचा फ्लॅट त्याला भाडेतत्त्वावर दिला होता. तिथेच तो त्याची पत्नी आणि दोन मुलीसोबत राहत होता. त्याच्या दोन्ही मुली धीरुभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकत होते. अनेकदा ते त्यांच्या खांद्याच्या दुखण्यावर फेनिलचा सल्ला घेत होते. याच दरम्यान फेनिलने त्याची जे. के ट्रॅव्हेल्स नावाची ट्रॅव्हेल्स कंपनी असून या कंपनीचे दादर येथे कार्यालय आहे.
1999 साली कंपनी सुरु केल्यानंतर त्याने आतापर्यंत पाच मर्सिडीज ब्रेझ व्होल्वो, दहा इनोव्हा क्रिस्टा कार घेतल्या असून या सर्व कार त्याने एल अॅण्ड टी, सिमेन्स आणि कॅडबरी कंपनीत भाडेतत्त्वावर दिल्या आहेत. त्यातून त्याला चांगला फायदा झाला आहे. त्यामुळे त्यांनी त्याच्या व्यवसायात गुंतवणुक करावी. या गुंतवणुकीवर तो त्यांना 24 टक्के परतावा देईल असे सांगून त्यांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला होता. फेनिलसोबत काही महिन्यांत कौटुंबिक संबंध निर्माण झाल्याने त्यांनी त्याच्या व्यवसायात गुंतवणुकीचा निर्णय घेतला होता. त्यानंतर त्यांनी त्याच्या कंपनीत 3 कोटी 93 लाखांची गुंतवणुक केली होती, या गुंतवणुकीनंतर त्याने त्यांना 76 लाख 55 हजार रुपये परत केले होते. मात्र उर्वरित 2 कोटी 79 लाख रुपयांची मूळ रक्कम तसेच या रक्कमेवरील व्याज दिले नाही.
वारंवार विचारणा करुनही त्याने त्यांना प्रतिसाद दिला नाही. नंतर त्याचा मोबाईल बंद येत होता. त्यामुळे ते त्याच्या माटुंगा येथील घरी गेले होते. यावेळी इमारतीच्या सुरक्षारक्षकाने फेनिल हा त्याच्या पत्नी आणि दोन मुलीसोबत फ्लॅट बंद करुन निघून गेल्याचे सांगितले. गुंतवणुकीच्या नावाने फेनिलकडून फसवणुक झाल्याचे लक्षात येताच तक्रारदाराने दिडोंशी पोलिसात तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर फेनिल मेहता याच्याविरुद्ध गुंतवणुकीच्या बहाण्याने 2.79 कोटीचा अपहार करुन तक्रारदार व्यावसायिकाची फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून त्याला लवकरच चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजाविले जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.