मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२ डिसेंबर २०२४
मुंबई, – मालाडच्या एका इमिटेशन ज्वेलरी व्यापार्याला खंडणीसाठी धमकी देण्यात आली आहे. याप्रकरणी व्यापार्याच्या तक्रारीवरुन विक्रम माळी या आरोपीविरुद्ध दिडोंशी पोलिसांनी खंडणीसाठी धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. विक्रम हा गुजरातचा रहिवाशी असल्याने त्याच्या अटकेसाठी दिडोंशी पोलिसांची एक टिम लवकरच गुजरातला जाणार आहे.
४२ वर्षांचे खोडाभाई रावजी माळी हे व्यापारी असून ते त्यांच्या कुटुंबियांसोबत मालाड परिसरात राहतात. त्यांचा इमिटेशन ज्वेलरीचा व्यवसाय आहे. ४ नोव्हेंबरला ते त्यांच्या घरी होते. यावेळी त्यांना विक्रम माळी याने तंना कॉल केला होता. त्याने स्वतची ओळख करुन त्यांना त्यांचा इमिटेशन ज्वेलरीचा व्यवसाय सुरु ठेवायचा आहे तर त्याला दरमाह सात लाख रुपयांची खंडणीची रक्कम द्यावी लागेल. ही रक्कम दिली नाहीतर त्यांना तिथे व्यवसाय करता येणार नाही अशी धमकी दिली होती. यावेळी त्याने त्यांना शिवीगाळ करुन जिवे मारण्याचीही धमकी दिली होती. ४ नोव्हेंबर ते २७ नोव्हेंबर या कालावधीत विक्रम माळी यांनी अनेकदा त्यांना खंडणीसाठी जिवे मारण्याची धमकी दिली होती. सुरुवातीला त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले होते. मात्र विक्रमने त्यांच्या पत्नीच्या अपहरणासह त्यांचा गेम करण्याची धमकी दिल्यानंतर त्यांनी दिडोंशी पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. यावेळी त्यांनी विक्रम माळीविरुद्ध तक्रार करुन त्याच्याविरुद्ध कारवाई करण्याची विनंती केली होती. त्यांच्या तक्रार अर्जानंतर पोलिसांनी विक्रम माळीविरुद्ध खंडणीसाठी धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. विक्रम माळी हा गुजरातच्या पालनपुर, बनास्क्रामाच्या भूषनगरचा रहिवाशी असल्याचे पोलिसांनी सांगितले.