मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१६ जानेवारी २०२५
मुंबई, – जेवणाच्या बिलावरुन झालेल्या वादातून रागाच्या भरात रेस्ट्रॉरंटची तोडफोड करुन ग्राहकासह पोलीस शिपायाला धक्काबुक्की करुन सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकणी तिघांविरुद्ध दिडोंशी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यात एका मेकअप आर्टिस्ट तरुणीचा समावेश आहे. याच गुन्ह्यांत दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. हयतिक विरेंद्र चौधरी आणि नईम समीम खान अशी या दोघांची नावे आहेत. अटकेनंतर या दोघांनाही बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. याच गुन्ह्यांत शिवानी प्रविण सिंग ऊर्फ सादिया नईम खान या २४ वर्षांच्या मेकअप आर्टिस्ट तरुणीला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. तिला ३५ (३) भारतीय न्याय सहिता कलमांतर्गत नोटीस देऊन सोडून देण्यात आले असून तिला या गुन्ह्यांत पाहिजे आरोपी दाखविण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
ही घटना मंगळवारी रात्री साडेदहा वाजता मालाड येथील दप्तरी रोड, लक्ष्मीविलास रेस्ट्रॉरंट ऍण्ड बारमध्ये घडली. रामदास दिनकर कुंभार हे पोलीस शिपाई असून ते सध्या दिडोंशी पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. मंगळवारी रात्री ते त्यांच्या सहकार्यासोबत परिसरात गस्त घालत होते. यावेळी मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुममधून लक्ष्मीविलास रेस्ट्रॉरंटमध्ये काहीजण गोंधळ घालत असून तिथे पोलीस मदतीची गरज असल्याचा कॉल पोलिसांना प्राप्त झाला होता. त्यानंतर पोलीस पथक तिथे गेले होते. यावेळी पोलिसांना हयतिक चौधरी, नईम खान आणि सादिया खान हे तिघेही लक्ष्मीविलास रेस्ट्रॉरंटमध्ये गेले होते. तिथे जेवणाच्या बिलावरुन त्यांचे रेस्ट्रॉरंटच्या कर्मचार्यांशी वाद झाला होता. याच वादातून त्यांनी रेस्ट्रॉरंटच्या सामानाची तोडफोड केली होती. एक ग्राहक अमीत यांना मारहाण केली होती. त्यात त्यांच्या डाव्या हाताचे करंगळीला फॅक्चर झाले होते. हा प्रकार लक्षात येताच रामदास कुंभार यांनी त्यांच्यातील वाद मिटविण्याचा प्रयत्न केला होता. त्याचा राग आल्याने हयतिक आणि सादिया यांनी त्यांच्या शर्टाचे कॉलर पकडून त्यांना धक्काबुक्की करुन सरकारी कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला होता.
ही माहिती प्राप्त होताच दिडोंशी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. यावेळी रेस्ट्रॉरंटमध्ये धिंगाणा करुन तोडफोड करणार्या तिघांनाही पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. याप्रकरणी रामदास कुंभार यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी तिन्ही आरोपीविरुद्ध पोलिसांशी हुज्जत घालून धक्काबुक्की करणे, सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच हहयतिक चौधरी आणि नईम खान या दोघांना पोलिसांनी अटक केली. पोलीस तपासात ते तिघेही गोरेगाव व मालाडचे रहिवाशी आहेत. यातील हयतिक हा शिक्षण घेत असून नईम हा स्विगी डिलीव्हरी बॉय आहे. सादिया ही मेकअप आर्टिस्ट आहे. तिला या गुन्ह्यांत पाहिजे आरोपी दाखवून नोटीस देऊन सोडून देण्यात आले होते.