मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२८ ऑक्टोंबर २०२४
मुंबई, – सुमारे ७१ लाख रुपयांच्या एमडी ड्रग्जसहीत एका २८ वर्षांच्या तरुणाला दिडोंशी पोलिसांनी अटक केली. आतिक मोहम्मद युनूस खान असे या आरोपीचे नाव असून तो गोरेगावचा रहिवाशी आहे. त्याच्याकडून पोलिसांनी २८७ ग्रॅम वजनाचा एमडी जप्त केला आहे. त्याच्याविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला असून याच गुन्ह्यांत त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकार्यांच्या आदेशानंतर सर्वच पोलीस ठाण्याच्या पोलीस अधिकारी आणि कर्मचार्यांनी परिसरात गस्त, नाकाबंदीवर भर दिला होता. ही गस्त सुरु असताना गोरेगाव येथील ओबेरॉय मॉलजवळ काहीजण एमडी ड्रग्जची डिलीव्हरीसाठी येणार असल्याची माहिती दिडोंशी पोलिसांना मिळाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक रईस शेख यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय राऊत व त्यांच्या सहकार्यांनी ओबेरॉय मॉलजवळील शिबा रोडवर साध्या वेशात पाळत ठेवून आतिक मोहम्मदला ताब्यात घेतले होते. त्याच्या अंगझडतीत पोलिसांना २८७ ग्रॅम वजनाचे एमडी ड्रग्ज सापडले. त्याची किंमत ७१ लाख ७५ हजार रुपये इतकी आहे.
चौकशीदरम्यान आतिक मोहम्मदने तो तिथे ड्रग्जची डिलीव्हरीसाठीआला होता. मात्र डिलीव्हरी करण्यापूर्वीच त्याला पोलिसांनी अटक केली. तो गोरेगाव येथील लिंक रोड, शहीद भगतसिंग क्रमांक एकच्या क्रांती चाळीत राहतो. एमडी ड्रग्ज जप्त केल्यानंतर त्याच्याविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याला ते एमडी ड्रग्ज कोणी दिले, तो तिथे कोणाला डिलीव्हरी करण्यासाठी आला होता. त्याने यापूर्वीही एमडी ड्रग्जची डिलीव्हरी केली आहे का, या गुन्ह्यांत त्याचे इतर कोणी सहकारी आहेत का याचा पोलीस तपास करत आहेत.