मोबाईल वादातून अल्पवयीन मुलाची चाकूने भोसकून हत्या
हत्येनंतर पळून गेलेल्या आरोपी मित्राला अटक व कोठडी
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२७ नोव्हेंबर २०२४
मुंबई, – मोबाईलवरुन झालेल्या क्षुल्लक वादातून फरदीन युसूफ खान या सोळा वर्षांच्या अल्पवयीन मुलाची त्याच्याच मित्राने चाकूने भोसकून हत्या केल्याची घटना मालाड परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या आरोपी मित्राला काही तासांत दिडोंशी पोलिसांनी अटक केली. आमीर गुल्लू सजादा असे या आरोपीचे नाव असून याच गुन्ह्यांत त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. साजिदचे वडिल एका हत्येच्या गुन्ह्यांत कारागृहात शिक्षा भोगत आहे, आता त्याच्या मुलाला हत्येच्या गुन्ह्यांत पोलिसांनी अटक केली आहे.
ही घटना मंगळवारी रात्री मालाडच्या राणी सती मार्ग, खोतडोंगरी परिसरात घडली. याच परिसरात फरदीन आणि आमीर हे दोघेही राहत असून ते दोघेही चांगले आहेत. त्यांना नशा करण्याचे व्यसन होते. मंगळवारी रात्री या दोघांनी नशा केली होती. यावेळी फरदीनने आमीरचा मोबाईल स्वतकडे ठेवला होता. त्याने त्याचा मोबाईल मागितला, मात्र वारंवार मागणी करुनही फरदीन त्याचा मोबाईल देत नव्हता. याच कारणावरुन त्यांच्यात प्रचंड वाद झाला होता. त्यातून रागाच्या भरात आमीर घरी गेला आणि त्याने भाजी कापण्याच्या चाकूने फरदीनवर वार केले होते. त्यात तो गंभीररीत्या जखमी झाला होता. स्थानिक रहिवाशांकडून ही माहिती मिळताच दिडोंशी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. जखमी झालेल्या फरदीनला पोलिसांनी जवळच्या शासकीय हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. छातीत गंभीर दुखापतीसह अधिक रक्तस्त्राव झाल्यामुळे त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता.
हल्ल्यानंतर आमीर हा पळून गेला होता. त्यामुळे त्याच्याविरुद्घ पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवून त्याचा शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असताना पोलीस उपायुक्त स्मिता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दिडोंशी पोलिसांच्या विशेष पथकाने आमीरला काही तासांत रेल्वे स्थानक परिसरातून पोलिसांनी अटक केली. चौकशीत त्याने मोबाईलवरुन झालेल्या वादातून फरदीनवर चाकूने हल्ला केल्याची कबुली दिली.अटकेनंतर त्याला बुधवारी दुपारी बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.
साजिदचे वडिल गुल्लू वली मोहम्मद याची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. २०१४ साली त्याने शिवसेना कार्यकर्ता रमेश जाधव याची हत्या केली होती. हत्येच्या याच गुन्ह्यांत त्याला पोलिसांनी अटक केली होती. सध्या गुल्लू वली मोहम्मद हा कारागृहात शिक्षा भोगत आहे. या गुन्ह्यांत त्याचे इतर नातेवाईक् सहआरोपी होते. साजिद हा त्याच्या आई आणि मोठ्या भावासोबत राहत होता तर फरदीन हा त्याच्या मावशीसोबत राहत होता. त्याच्या वडिलांनी दुसरे लग्न केले असून तो त्याच्या पत्नीसोबत राहतो. फरदीन आणि साजिद हे दोघेही एकाच परिसरात राहत असल्याने एकमेकांच्या परिचित होते. त्यांची चांगली मैत्री होती. या दोघांना ड्रग्जचे सेवन करण्याची सवय होती. गुन्ह्यांच्या रात्रीही या दोघांनी ड्रग्जचे सेवन केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.