२६ वर्षांपासून वॉण्टेड असलेल्या आरोपीस अटक

दरोड्यासह हत्येच्या प्रयत्नाचा गुन्ह्यांची नोंद होती

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१८ ऑक्टोंबर २०२४
मुंबई, – मालाड परिसरात दरोड्यादरम्यान स्थानिक पोलिसांवर दगडफेक करुन घातक शस्त्रांनी प्राणघात हल्ला केल्याचा आरोप असलेल्या एका आरोपीस २६ वर्षांनी अटक करण्यात दिडोंशी पोलिसांना यश आले आहे. शंकर बाजीराव काळे ऊर्फ नाना असे या ५५ वर्षीय आरोपीचे नाव असून सहा महिने कारागृहात राहिल्यानंतर जामिनावर बाहेर आल्यानंतर तो पळून गेला होता. अखेर २६ वर्षांनी त्याला पुन्हा अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.

५ ऑक्टोंबर १९९६ रोजी रात्री उशिरा मालाड येथील दप्तरी रोड, छत्रपती शिवाजी महाराज चौक, एलोरा सहकारी सोसायटीमध्ये चड्डी बनियान टोळीने सशस्त्र दरोडा टाकला होता. पळून जाताना या आरोपींना गस्त घालणार्‍या पोलिसांनी पकडण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी या आरोपींनी पोलिसांवर दगडफेक केली होती, घातक शस्त्रांनी प्राणघातक हल्ला केला होता. त्यात काही पोलिसांसह साक्षीदार गंभीररीत्या जखमी झाले होते. या हल्ल्यानंतर पोलिसांनी स्वरक्षणार्थ आरोपींच्या दिशेने गोळीबार केला होता. या गोळीबारात चड्डी बनियान टोळीचा म्होरक्या चकमकीत मारला गेला होता तर त्याचे चार सहकारी चोरीच्या मुद्देमालासह अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले होते. या घटनेची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत आरोपींच्या अटकेसाठी विशेष मोहीम हाती घेण्याचे आदेश स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेला दिले होते. या आदेशानंतर या पथकाने पळून गेलेल्या तिघांना संभाजीनगर परिसरातून अटक केली होती. त्यात शंकर काळे याचा समावेश होता. सहा महिने कारागृहात राहिल्यानंतर त्याला जामिन मंजूर झाला होता.

जामिनावर बाहेर येताच शंकर काळे हा पळून गेला होता. तो खटल्याच्या सुनावणीच्या वेळेस सतत गैरहजर राहत होता. त्यामुळे या आरोपीच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. पोलीस उपायुक्त स्मिता पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त दत्तात्रय ढोले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक इरफान शेख, पोलीस निरीक्षक कावडे यांच्या मार्गदर्शनाखाली तडीपार कक्षाचे पोलीस उपनिरीक्षक संदीप वत्रे, पोलीस हवालदार शिंदे, पवार, कांबळे, वायगणकर, शिंदे, पोलीस शिपाई वैरागर, भंडारे यांनी आरोपीचा शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असताना शंकर हा सांताक्रुज येथील के. के गांगुली मार्ग, एकता चाळीत राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर पोलिसांनी तिथे साध्या वेशात पाळत ठेवली होती. याच दरम्यान शंकर हा किराणा दुकानात सामान घेण्यासाठी आला होता. यावेळी त्याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले.

सुरुवातीला त्याने तो शंकर काळे नसल्याचे सांगून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र कसून चौकशी केल्यानंतर तो वॉण्टेड आरोपी शंकर असल्याचे उघडकीस आले. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात न्यायालयात हजर करण्यात आले होते. गेल्या २६ वर्षांपासून शंकर हा वॉण्टेड होता, अखेर त्याला पकडण्यात यश आल्याने पोलीस उपायुक्त स्मिता पाटील यांनी संबंधित पोलीस पथकाचे कौतुक केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page