मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
16 जुलै 2025
मुंबई, – ट्यूशनसाठी आलेल्या एका सात वर्षांच्या अल्पवयीन मुलीचा तिच्याच खाजगी ट्यूशन शिक्षकाने लैगिंक चाळे केल्याची घटना गोरेगाव परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी लैगिंक अत्याचारासह पोक्सोच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच 44 वर्षांच्या शिक्षकाला दिडोंशी पोलिसांनी अटक केली आहे. अटकेनंतर त्याला दिडोंशीतील पोक्सो कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
49 वर्षांचे तक्रारदार व्यावसायिक असून ते गोरेगाव येथे त्यांच्या कुटुंबियांसोबत राहतात. त्यांच्याच शेजारी आरोपी राहत असून तो त्याच्या राहत्या घरी खाजगी ट्यूशन घेतो. त्याच्याच घरी त्यांची सात वर्षांची मुलगी ट्यूशनसाठी जात होती. ऑगस्ट 2024 ते जुलै 2025 या कालावधीत त्यांची मुलगी ट्यूशनला त्याच्या घरी असताना तो तिला मोबाईलवर गेम दाखविण्याचा बहाणा करुन तिला बेडरुममध्ये नेऊन तिच्याशी अश्लील चाळे करत होता. ती अल्पवयीन असल्याचे माहित असताना तिच्यावर त्याने लैगिंक चाळे केले होते.
सुरुवातीला तिने हा प्रकार कोणालाही सांगितला नाही. मात्र अलीकडेच ही माहिती या मुलीकडून तक्रारदारांना समजली होती. ही माहिती ऐकल्यानंतर त्यांना प्रचंड मानसिक धक्का बसला होता. त्यामुळे त्यांनी घडलेला प्रकार दिडोंशी पोलिसांना सांगून आरोपी शिक्षकाविरुद्ध तक्रार केली होती. याप्रकरणी भारतीय न्याय सहिता आणि पोक्सोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच आरोपी शिक्षकाला त्याच्या राहत्या घरातून पोलिसांनी अटक केली.
अटकेनंतर त्याला बुधवारी दिडोंशीतील विशेष पोक्सो कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. पिडीत मुलगी आणि आरोपी एकाच इमारतीमध्ये शेजारी राहत असल्याने या घटनेने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली होती.