चोरीच्या गुन्ह्यांत 23 वर्षांच्या केअरटेकर तरुणीला अटक
घरात कोणीही नसल्याची संधी साधून चोरी करुन केले पलायन
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
22 जून 2025
मुंबई, – चोरीच्या गुन्ह्यांत एका 23 वर्षांच्या केअरटेकर तरुणीला दिडोंशी पोलिसांनी अटक केली. प्रिती ओमकार मालप ऊर्फ प्रिती पाटील असे या तरुणीचे नाव असून चोरीच्या याच गुन्ह्यांत ती सध्या पोलीस कोठडीत आहे. घरात कोणीही नसल्याची संधी साधून तिने सोन्याच्या दागिन्यासह कॅश असा साडेचार लाखांचा मुद्देमाल चोरी करुन पलायन केले होते. चोरीचा हा मुद्देमाल लवकरच हस्तगत केला जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
अनुष्का रुपेश बोवलेकर ही महिला मालाड परिसरात राहत असून खार येथील एका खाजगी कंपनीत कामाला आहे. 2010 साली तिच्या वडिलांचे निधन झाले होते, तेव्हापासून तिची आई तिच्यासोबत राहते. तिच्या आईला दरमाह 26 हजार रुपयांचे पेंशन मिळते. ती रक्कम तिची आई तिच्याकडे सेव्हींग म्हणून जमा करत होती. आईचे वय आणि तिच्या प्रकृतीमुळे तिने एका खाजगी एजन्सीमार्फत प्रिती पाटील या तरुणीला तिच्या घरी केअरटेकर म्हणून कामावर ठेवले होते. प्रिती ही 29 मेपासून प्रिती ही नालासोपारा येथील हनुमाननगर, जय हॅरिटेज अपार्टमेंटमध्ये राहत होती.
अनुष्का बोवलेकर हिच्याकडे ती सकाळी दहा ते रात्री आठ या वेळेत कामासाठी येत होती. रात्री आठनंतर ती तिच्या घरी निघून जात होती. 9 जूनला ती तिच्या आईला घेऊन हॉस्पिटलमध्ये चेकअपसाठी घेऊन गेली होती. यावेळी तिच्या आईने कपाटातील काही दागिन्यांपैकी एक नेकलेस घातला होता. हॉस्पिटलमधून येताना हा नेकलेस रिक्षा प्रवासादरम्यान कुठेतरी गहाळ झाला होता. 12 जूनला सायंकाळी पावणेसात वाजता तिच्या मुलीने प्रितीला घरातून घाईघाईने बाहेर जाताना पाहिले होते,
हा प्रकार संशयास्पद वाटताच तिने तिची आई अनुष्काला सांगितला होता. याच दरम्यान प्रितीला कॉल करुन ती दहा दिवस कामावर येणर नाही असे सांगितले. प्रितीचे घरातून अचानक निघून जाणे आणि त्याच रात्री दहा दिवस कामावर येणार नाही असे सांगणे तिला विचित्र वाटले. त्यामुळे तिने कपाटातील दागिन्यासह कॅशची पाहणी केली होती. यावेळी तिला तिच्या आईचे दागिने आणि कॅश कपाटात सापडले नाही. संपूर्ण कपाटाची पाहणी केल्यानंतर तिला कपाटातून विविध सोन्याचे दागिने आणि अडीच लाख रुपयांची कॅश असा सुमारे साडेचार लाखांचा मुद्देमाल चोरीस गेल्याचे दिसून आले.
ही चोरी प्रितीनेच केल्याचा संशय व्यक्त करुन तिने दिडोंशी पोलिसांत तिच्याविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर प्रिती पाटीलविरुद्ध पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच तिचा पोलिसांनी शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असताना प्रितीला नालासोपारा येथून पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीत या गुन्ह्यांत तिचा सहभाग उघडकीस आला होता. त्यानंतर तिला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर तिला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते, यावेळी कोर्टाने तिला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तिच्याकडून लवकरच चोरीचा सर्व मुद्देमाल हस्तगत केला जाणार असल्याचे एपीआय ओम तोटावार यांनी सांगितले.