चोरीच्या गुन्ह्यांत तक्रारदाराच्या पत्नीलाच अटक

प्रियकरासोबत लग्न करण्यासाठी चोरी केल्याची कबुली

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
10 सप्टेंबर 2025
मुंबई, – गोरेगाव येथील झालेल्या चोरीचा पर्दाफाश करण्यात दिडोंशी पोलिसांना यश आले आहे. या चोरीप्रकरणी तक्रारदाराच्या पत्नीलाच पोलिसांनी अटक करुन तिच्याकडून चोरीचा सर्व मुद्देमाल हस्तगत केला आहे. उर्मिला रमेश हलदिवे असे या 37 वर्षीय महिलेचे नाव असून तिचे एका तरुणासोबत प्रेमसंबंध होते. त्याच्यासोबत पळून जाऊन लग्न करायचे तसेच त्यासाठी पैशांची गरज असल्याने तिने स्वतच्याच घरी चोरी केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. या वृत्ताला वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र शिंदे यांनी दुजोरा दिला आहे. अटकेनंतर उर्मिलाला बोरिवलीतील लोकल कोर्टाने चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

रमेश धोंडू हलदिवे हे गोरेगाव येथील संतोषनगर, फिल्मसिटी रोडच्या बीएमसी कॉलनीत त्याची पत्नी उर्मिला आणि दोन मुलांसोबत राहत असून महानगरपालिकेतील पाणीपुरवठा विभागात कामाला आहेत. 26 ऑगस्टला त्यांनी कपाटातील सोन्याच्या दागिन्यांची पाहणी केली असता त्यांना कपाटातून तीन लाख तीस हजार रुपयांचे विविध सोन्याचे दागिन्यासह इतर साहित्य चोरीस गेल्याचे दिसून आले. सकाळी उठल्यानंतर त्यांना त्यांच्या घराचा दरवाजा उघडा असल्याचे दिसून आले. घरात प्रवेश करुन अज्ञात चोरट्याने कपाटातील सोन्याचे दागिने आणि इतर मुद्देमाल चोरी करुन पलायन केले होते. त्यामुळे त्यांनी घडलेला प्रकार दिडोंशी पोलिसांना सांगून तिथे अज्ञात व्यक्तीविरुद्ध चोरीची तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला होता.

दिवसाढवळ्या झालेल्या या चोरीच्या घटनेची वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र शिंदे यांनी गंभीर दखल घेत गुन्हे शाखेला तपासाचे आदेश दिले होते. या आदेशानंतर पोलिसांनी तपास सुरु केला होता. परिसरातील सीसीटिव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीवरुन पोलिसांनी आरोपीची ओळख पटविण्याचा प्रयत्न सुरु केला होता. रमेश हलदिवे आणि त्यांची पत्नी उर्मिला हलदिवे यांच्या चौकशीत त्यांच्या घरी 2018 साली अशाच प्रकारे चोरी झाली होती. मात्र या गुन्ह्यांचा गुन्ह्यांचा छडा लागला नव्हता. त्यामुळे या वेळेस पोलिसांना आरोपीला पकडता येणार नाही, आमचे दागिने मिळणार नाही असा आरोप करुन उर्मिलाने पोलिसांच्या तपासाबाबत आक्षेप घेतला होता. तिच्या चौकशीतून ती वेगवेगळी माहिती सांगून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत होती. त्यामुळे हाच धागा पकडून पोलिसांनी तिच्याविषयी माहिती काढण्यास सुरुवात केली होती. त्यात पोलिसांना काही गोष्टींचा खुलासा करण्यात यश आले.

या माहितीनंतर अतिरिक्त पोलीस आयुक्त शशिकुमार मीना, पोलीस उपायुक्त आनंद भोईटे, सहाय्यक पोलीस आयुक्त दत्तात्रय ढोले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार प्रविण मोरे, पोलीस हवालदार माईंगडे, रोडे, भोगले, पोलीस शिपाई काटे, जानराव आणि झिंबल यांनी तक्रारदार रमेश हलदिवे यांची पत्नी उर्मिलाला चौकशीसाठी ताब्यात घेतले. तिच्या चौकशीत तिचे एका तरुणासोबत प्रेमसंबंध होते. या दोघांना पळून लग्न करायचे होते, त्यासाठी त्यांना पैशांची गरज होती. त्यामुळे तिने तिच्याच घरी चोरीची योजना बनविली होती. चोरीनंतर ते दोघेही तेथून जाणार होते.

ठरल्याप्रमाणे तिने 25 ऑगस्टला रात्री उशिरा कपाटातील सोन्याचे दागिन्यासह इतर मुद्देमालाची चोरी केली होती. त्यातील काही दागिने तिने तिच्या प्रियकराकडे लपवून ठेवले होते. चोरीचे दागिने तिच्या प्रियकराकडून पोलिसांनी ताब्यात घेतले. या गुन्ह्यांत त्याचा सहभाग उघडकीस आला नाही, त्यामुळे त्याची जबानी नोंदवून नंतर तिला पोलिसांनी सोडून दिले होते. या कबुलीनंतर उर्मिलाला पोलिसांनी चोरीच्या गुन्ह्यांत अटक केली. तिच्याकडून चोरीचा सर्व मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. पोलीस कोठडीनंतर तिला बोरिवलीतील लोकल कोर्टाने चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तपासावरुन पोलिसांना आव्हान देणारी उर्मिला हीच या कटातील मुख्य आरोपी असल्याचे चौकशीतून उघडकीस आल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र शिंदे यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page