आर्थिक गुन्हे शाखेनंतर ईडीकडून दिनो मोरियाची चौकशी होणार

पुढील आठवड्यात चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स जारी

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
7 जून 2025
मुंबई, – मिठी नदीच्या पूर्नर्जिवितेत झालेल्या 65 कोटी 54 लाखांच्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी सिनेअभिनेता दिनो मोरियाची आर्थिक गुन्हे शाखेकडून दोन वेळेस चौकशी झाली असता आता त्याची ईडीकडून चौकशी होणार आहे. पुढील आठवड्यात दिनोला चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स जारी करण्यात आले आहे. मनी लॉड्रिंगप्रकणी ही चौकशी होणार असून या चौकशीत त्याचा सहभाग उघडकीस आल्यास त्याच्यावर अटकेची कारवाई होऊ शकते. त्यामुळे दिनोच्या अडचणीत चांगलीच वाढ झाली आहे.

मे महिन्यांच्या दुसर्‍या आठवड्यात मिठी नदी गाळ काढण्याच्या झालेल्या कामात कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याचे उघडकीस आले होते. हा प्रकार उघडकीस येताच मनपाचे वरिष्ठ अधिकारी प्रशांत रामुगडे, गणेश बेंद्रे, तायशेट्टे, दिपक मोहन, किशोन मेनन, जय जोशी, केतन कदम, भुपेंद्र पुरोहित यांच्यासह अ‍ॅक्युट डिजाईन्स, कैलास कंन्ट्रक्शन, एन. ए कन्स्ट्रक्शन, निखिल कंन्स्ट्रक्शन, जे. आर एस इन्फ्रास्टक्चर कंपनीच्या संचालकाविरुद्ध विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल होताच केतन अरुण कदम आणि जय अशोक जोशी या दोघांना पोलिसांनी अटक केली होती. यातील केतन कदम याचे मोरिया बंधूंशी घनिष्ठ संबंध असून त्यांच्यात अनेकदा मोबाईलवरुन संभाषण झाल्याचे उघडकीस आले होते. त्यामुळे या दोन्ही बंधूंची आर्थिक गुन्हे शाखेकडून दोन वेळा चौकशी करुन जबानी नोंदविण्यात आली होती.

याच चौकशीतून या प्रकरणात मनी लॉड्रिंग झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. त्याची ईडीने गंभीर दखल घेत स्वतंत्रपणे तपास सुरु केला होता. त्याचाच एक भाग म्हणून ईडीने शुक्रवारी मुंबईसह केरळमधील कोची शहरात छापे टाकले होते. गाळ काढण्याचे यंत्रसामग्री पुरविणार्‍या कंपनीपैकी एक मॅटप्रॉप टेक्निकल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड ही कोचीची कंपनी आहे. त्यामुळे ईडीने शुक्रवारी मुंबईसह केरळ शहरात या घोटाळ्याशी संबंधित मनी लॉड्रिंग चौकशीचा एक भाग म्हणून अभिनेता दिनो मोरिया, काही महानगरपालिका अधिकारी आणि कंत्राटदारासह इतरांच्या घरासह कार्यालयात छापे टाकले होते.

जवळपास पंधरा ठिकाणी ही कारवाई करण्यात आली होती. या छापेमारीत घोटाळ्यासह मनी लॉड्रिंगसंदर्भातील काही महत्त्वाचे दस्तावेज ईडीने जप्त केले होते. या दस्तावेजाची तपासणी सुरु आहे. या गुन्ह्यांत दिनो मोरियाच्या सहभागाबाबत काही पुरावे सापडल्याने ईडीने त्याला चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजाविले आहे. पुढील आठवड्यात दिनोला चौकशीसाठी बोलाविण्यात आले आहे. त्यामुळे त्याला चौकशीसाठी हजर राहावे लागणार आहे. या चौकशीनंतर त्याच्यावर पुढील काय कारवाई करायची याची दिशा ठरली जाणार आहे. आधीच आर्थिक गुन्हे शाखेकडून दोन वेळा चौकशी झाल्यानंतर आता दिनो मोरियाला ईडीकडून चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजाविण्यात आले आहे. त्यामुळे त्याच्या अडचणीत चांगलीच वाढ झाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page