सिनेअभिनेता दिनो मोरियाची ईडीकडून चार तास चौकशी

पुन्हा चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस बजाविली

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
12 जून 2025
मुंबई, – मिठी नदीच्या पूर्नर्जिवितेत झालेल्या 65 कोटी 54 लाखांच्या आर्थिक घोटाळ्यात झालेल्या मनी लॉड्रिंगप्रकरणी सिनेअभिनेता दिनो मोरियाची आर्थिक गुन्हे शाखेनंतर गुरुवारी सकाळी ईडीकडून तब्बल चार तास कसून चौकशी करण्यात आली. या चौकशीचा तपशील समजू शकला नाही, मात्र त्याच्या सहभागाबाबत त्याला काही प्रश्ने विचारण्यात आले. ही चौकशी अपूर्ण राहिल्याने दिनो मोरियाला पुन्हा चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजाविण्यात आले आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणात दिनो मोरिया चांगलाच अडचणीत सापडला आहे.

मे महिन्यांच्या दुसर्‍या आठवड्यात मिठी नदी गाळ काढण्याच्या झालेल्या कामात कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याचे उघडकीस आले होंते. हा प्रकार उघडकीस येताच मनपाचे वरिष्ठ अधिकारी प्रशांत रामुगडे, गणेश बेंद्रे, तायशेट्टे, दिपक मोहन, किशोन मेनन, जय जोशी, केतन कदम, भुपेंद्र पुरोहित यांच्यासह अ‍ॅक्युट डिजाईन्स, कैलास कंन्ट्रक्शन, एन. ए कन्स्ट्रक्शन, निखिल कंन्स्ट्रक्शन, जे. आर एस इन्फ्रास्टक्चर कंपनीच्या संचालकाविरुद्ध विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल होताच केतन अरुण कदम आणि जय अशोक जोशी या दोघांना पोलिसांनी अटक केली होती.

यातील केतन कदम याचे मोरिया बंधूंशी घनिष्ठ संबंध असून त्यांच्यात अनेकदा मोबाईलवरुन संभाषण झाल्याचे उघडकीस आले होते. त्यामुळे या दोन्ही बंधूंची आर्थिक गुन्हे शाखेकडून दोन वेळा चौकशी करुन जबानी नोंदविण्यात आली होती. याच चौकशीतून या प्रकरणात मनी लॉड्रिंग झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. त्याची ईडीने गंभीर दखल घेत स्वतंत्रपणे तपास सुरु केला होता.

त्याचाच एक भाग म्हणून ईडीने शुक्रवारी 6 जूनला मुंबईसह केरळमधील कोची शहरात छापे टाकले होते. त्यात महानगरपालिकेचे इंजिनिअर, कॉन्ट्रक्टर भुपेंद्र पुरोहित, मेसर्च मेटाप्रॉप टेक्निकल सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड, मेसर्च विर्गो स्पेशलिटीज प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक जय जोशी, मेसर्च वोडर इंडिया एलएलपी कंपनीचे नियंत्रक केतन कदम, सिनेअभिनेता दिनो रोक्को मोरिया, त्याचा भाऊ सॅटिनो रोक्को मोरिया यांच्या कार्यालय आणि घरातून काही डिजिटल डिवाईस, आक्षेपार्ह दस्तावेज, सात लाखांची कॅश जप्त केली होती. तसेच वेगवेगळ्या व्यक्तीसह कंपनीचे बारा बँक खाती, एफडीआर आणि एक डिमेट खाते फ्रिज केले होते.

आतापर्यंत जप्त केलेल्या मुद्देमालाची किंमत सव्वाकोटी रुपये इतकी आहे. या गुन्ह्यांत दिनो मोरियाच्या सहभागाबाबत काही पुरावे सापडल्याने ईडीने त्याला चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजाविले होते. त्यामुळे गुरुवारी सकाळी दिनो मोरिया ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर झाला होता. सुमारे चार तास चौकशी केल्यानंतर त्याला सोडून देण्यात आले होते. यावेळी त्याला पुन्हा चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजाविण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page