मिठी नदी गैरव्यवहारप्रकरणी मोरिया बंधूंची पुन्हा चौकशी

सोमवारनंतर बुधवारी चौकशीनंतर जबानी नोंदवून घेतली

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
28 मे 2025
मुंबई, – मिठी नदीच्या पूर्नर्जिवितेत झालेल्या 65 कोटी 54 लाखांच्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी सिनेअभिनेता दिनो मोरिया याच्यासह त्याचा भाऊ सॅटिनो मोरिया यांची पुन्हा आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी कसून चौकशी केली होती. या चौकशीनंतर त्यांना पुन्हा चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स देऊन सोडून देण्यात आले. या संपूर्ण प्रकरणात मोरिया याचा सहभाग उघडकीस आला असून त्यांच्याविरुद्ध पुरावे प्राप्त झाल्याचे दावा पोलिसांकडून करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणीत चांगलीच वाढ झाली आहे.

मे महिन्यांच्या दुसर्‍या आठवड्यात मिठी नदी गाळ काढण्याच्या झालेल्या कामात कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याचे उघडकीस आले होते. हा प्रकार उघडकीस येताच मनपाचे वरिष्ठ अधिकारी प्रशांत रामुगडे, गणेश बेंद्रे, तायशेट्टे, दिपक मोहन, किशोन मेनन, जय जोशी, केतन कदम, भुपेंद्र पुरोहित यांच्यासह अ‍ॅक्युट डिजाईन्स, कैलास कंन्ट्रक्शन, एन. ए कन्स्ट्रक्शन, निखिल कंन्स्ट्रक्शन, जे. आर एस इन्फ्रास्टक्चर कंपनीच्या संचालकाविरुद्ध विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल होताच केतन अरुण कदम आणि जय अशोक जोशी या दोघांना पोलिसांनी अटक केली होती. याच गुन्ह्यांत ते दोघेही सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. यातील केतन कदम याचे मोरिया बंधूंशी घनिष्ठ संबंध असून त्यांच्यात अनेकदा मोबाईलवरुन संभाषण झाल्याचे उघडकीस आले होते. त्यामुळे या दोन्ही बंधूंना चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजाविण्यात आले होते.

सोमवारी सकाळी अकरा वाजता दिनो आणि त्याचा भाऊ सॅटिनो मोरिया हे दोघेही आर्थिक गुन्हे शाखेत चौकशीसाठी हजर झाले होते. यावेळी या दोघांची पोलिसांकडून कसून चौकशी करुन जबानी नोंदविण्यात आली होती. या चौकशीला काही तास उलटत नाही तोवर बुधवारी पुन्हा मोरिया बंधू चौकशीसाठी आर्थिक गुन्हे शाखेत हजर झाले होते. यावेळी त्यांची दुसर्‍यांदा पोलिसांकडून चौकशी करण्यात आली होती. याच संपूर्ण प्रकरणात मनी लॉड्रिंग झाल्याचा संशय आहे. त्यामुळे त्याचा स्वतंत्र तपास ईडीने सुरु केला आहे. या घोटाळ्यातील कंत्राटदारांनी नऊ बोगस करार केले होते. या बोगस करारासह कागदपत्रे सादर करुन या कंपन्यांनी महानगरपालिकेकडून सुमारे 65 कोटीचे पेमेंट करुन हा संपूर्ण घोटाळा केला होता. मोरिया बंधूंच्या चौकशीचा तपशील समजू शकला नाही. मात्र चौकशीनंतर त्यांना सोडून देण्यात आले. गरज पडल्यास त्याला पुन्हा चौकशीसाठी बोलाविण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page