दिशा सालियन हिच्या मृत्यूची नव्याने चौकशी होणार
दिशाच्या वडिलांकडून पोलीस आयुक्तांना तक्रार अर्ज सादर
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
25 मार्च 2025
मुंबई, – जून 2020 साली मालाडच्या मालवणी परिसरातील एका पॉश अपार्टमेंटमधून पडून मृत्यू झालेल्या सेलिब्रिटी मॅनेजर दिशा सतीश सालियन हिच्या मृत्यूची नव्याने चौकशी होणार असल्याचे बोलले जात आहे. दिशाचे वडिल सतीश सालियान यांनी त्यांच्या वकिलासोबत मंगळवारी पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांची भेट घेऊन तक्रार अर्ज सादर करताना दिशाच्या कथित मृत्यूची चौकशी करुन दोषी व्यक्तीवर सक्त कारवाई करण्याची मागणी केली आहे. या अर्जात त्यांनी दिशावर सामूहिक लैगिंक अत्याचारासह तिची हत्या करुन हत्येचा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप केला आहे. या अर्जात त्यांनी शिवसेना नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग, वादग्रस्त चकमकफेम अधिकारी सचिन वाझे यांच्यासह बॉलीवूडच्या काही कलाकारांवर गंभीर आरोप करुन त्यांनी या हत्येचे पुरावा नष्ट केल्याचे नमूद केले आहे.
दिशा सालियन ही सिनेअभिनेता सुशांत सिंग राजपूत यांच्याकडे सेलिब्रिटी मॅनेजर म्हणून काम करत होती. सुशांतसिंगच्या आत्महत्येपूर्वी दिशा सालियनने आत्महत्या केली होती. ती तिच्या काही मित्रांसोबत तिच्या प्रियकराच्या मालवणीतील पॉश अपार्टमेंटमध्ये आली होती. तिथेच त्यांनी मद्यप्राशन केले होते. यावेळी तिचा तोल गेला आणि ती इमारतीवरुन खाली पडली होती. या संपूर्ण प्रकरणाची आधी मालवणी आणि नंतर गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी चौकशी केली होती. तिच्या पालकांसह उपस्थित मित्रांची चौकशी करुन जबानी नोंदविण्यात आली होती. या जबानीत तिच्या पालकासह मित्रांनी कोणावरही संशय व्यक्त केला नव्हता. दिशाने आत्महत्या केल्याचे त्यांनी त्यांच्या जबानीत म्हटले होते. त्यानंतर पोलिसांनी आत्महत्येची नोंद करुन तपास बंद केला होता.
मात्र पाच वर्षांनी दिशाचे वडिल सतीश सालियन यांनी दिशाने आत्महत्या केली असून तिची हत्या झाल्याचा आरोप करताना तिच्यावर सामूहिक लैगिंक अत्याचार झाल्याचे सांगून मुंबई उच्च न्याायालयात एक याचिका दाखल केली होती. ही याचिका दाखल करुन न्यायालयाने 2 एप्रिलला पुढील सुनावणी ठेवली आहे. ही याचिका सादर केल्यांनतर सतीश सालियन यांनी त्यांच्या वकिलांच्या मदतीने पोलीस आयुक्तांची भेट घेऊन दिशाच्या कथित मृत्यूची पुन्हा चौकशी करण्याची विनंती केली होती. यावेळी त्यांनी 75 पानांचा एक तक्रार अर्ज सादर केला आहे. त्यात त्यांनी माजी मंत्री आदित्य ठाकरे, माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग, चकमकफेम अधिकारी दया नायक, बॉलीवूड कलाकार दिनो मोरिया, सुरज पंचोली, सुशांतची प्रेयसी रिया चक्रवर्ती त्यांचे सुरक्षारक्षकावर गंभीर आरोप केले आहेत.
हा गुन्हा दडपण्यासाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशावरुन पोलिसांनी स्वतच्या पदाचा दुरुपयोग करुन साक्षीदारांना धमकाविले, पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे या सर्वांविरुद्ध गुन्हा दाखल करुन त्यांची चौकशी करण्याची विनंती केली आहे. त्यामुळे दिशाच्या कथित मृत्यूची पोलिसांकडून चौकशी होणार की नाही याबाबत येत्या 2 एप्रिलला शिक्कामोर्तब होणार आहे. त्याच दिवशी उच्च न्यायालयात सुनावणी होणार असून न्यायालयाने मुंबई पोलिसांना आदेश दिल्यास दिशाच्या मृत्यूची नव्याने चौकशी होणार आहे.