डिजीटल रक्षक हेल्पलाईन सेवा मुंबई पोलिसाकडून सुरु
डिजीटल अरेस्टच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी मुंबई पोलीस सज्ज
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
16 एप्रिल 2025
मुंबई, – गेल्या काही वर्षांत डिजीटल अरेस्टच्या नावाखाली सर्वसामान्यांची विशेषता निवृत्त वयोवृद्धांच्या होणार्या फसवणुकीला आळा घालण्यासाठी मुंबई पोलीस सज्ज झाले आहे. त्यासाठी मुंबई पोलिसांनी डिजीटल रक्षक नावाच्या दोन नवीन हेल्पलाईन सेवा सुरु केली आहे. 7715004444 आणि 7400086666 असे या हेल्पलाईनचे क्रमांक असून या मोबाईलवर नागरिकांना त्यांची तक्रार नोंदविता येणार आहे. पोलीस, सीबीआय, ईडीसह इतर तपास यंत्रणेच्या नावाने डिजीटल अरेस्टच्या नावाने बँक खात्यात डल्ला मारला जातो. अशा गुन्हे रोखण्यासाठी ही हेल्पलाईन सुरु करण्यात आली असून या हेल्पलाईन सेवेमुळे अशा फसवणुकीच्या प्रकाराला आळा घालण्यात यश येईल असा दावा पोलिसांकडून करण्यात आला आहे.
गेल्या काही वर्षांत देशभरात सायबर गुन्ह्यांत लक्षणीय वाढ झाली आहे. दैनदिन इंटरनेट आणि मोबाईलच्या वापरामुळे सायबर गुन्ह्यांच्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून आले आहे. नवीन तांत्रिक प्रगती आणि सामाजिक गरजांना मिळत असलेला जनतेचा प्रतिसाद पाहून सायबर गुन्हेगार सतत त्यांच्या पद्धती बदलत आहे. ऑनलाईन नोकरी, शेअरमार्केट गुंतवणुक, फिशिंग, क्रेडिट कार्ड, सेक्सटोर्शन, कर्ज, विवाहविषयक फसवणुक आदी गुन्हे प्रचलित असताना गेल्या काही वर्षांत सायबर ठग पोलीस, आयकर अधिकारी, कुरिअर कंपनीचे प्रतिनिधी, सीबीआय आणि ईडीच्या नावाने भीती दाखवून डिजीटल अरेस्टची धमकी देऊन बँक खात्यावर डल्ला मारतात, खासकरुन वयोवृद्धांना या सायबर ठगांकडून फसविले जाते.
बोगस ओळखपत्र तसेच नोटीस पाठवून नागरिकांना घाबरुन, त्यांना त्यांच्या राहत्या घरी डिजीटल अरेस्टची धमकी दिली जात होते. त्यांच्या बँक खात्यासह प्रॉपटीची माहिती घेऊन त्यांची फसवणुक केली जात आहे. याबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती करुनही अशा गुन्ह्यांना आळा घालण्यात पोलिसांना यश आले नव्हते. डिजीटल अरेस्ट तर कधी ड्रग्ज पार्सलच्या नावाखाली फसवणुकीचे गुन्हे वाढत चालले होते. त्यामुळे अशा गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी मुंबई पोलिसांनी आता डिजीटल रक्षक नावाच्या दोन हेल्पलाईन सेवा सुरु केल्या आहे. 7715004444 आणि 7400086666 असे या हेल्पलाईनचे क्रमांक आहेत. या क्रमांकावर नागरिकांना कॉल किंवा व्हॉटअपद्वारे पोलिसांशी संपर्क साधता येणार आहे.
डिजीटल रक्षक ही हेल्पलाईन सेवा सुविधा सातही दिवस 24 तास कार्यरत राहणार असून त्यात नागरिकांनी संपर्क साधल्यास त्यांना फसवणुकीला बळी पडण्यापूर्वी संशयास्पद कॉल्सची आणि पाठविलेल्या कोणत्याही सरकारी दस्तावजाची वैधता पडताळणी करता येणार आहे. या घटनेचे गांभीर्य लक्षात ठेवून संबंधित व्यक्तीच्या घरी तातडीने पोलीस मदत पाठविली जाणार आहे. पिडीतांची समुपदेशन करुन मदत करता येईल. तसेच अशा सायबर ठगांपासून त्यांची फसवणुक होण्यापासून वाचता येईल. त्यामुळे सर्व नागरिकांनी मुंबई पोलिसांनी सुरु केलेल्या या डिजीटल रक्षक हेल्पलाईन सेवेचा उपयोग करावा आणि सायबर सुरक्षित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.