4169 मुंबईकारांना 18.98 कोटीची मालमत्ता परत करुन दिवाळी भेट
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांकडून मुंबईकारांना सुखद धक्का
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
19 ऑक्टोंबर 2025
मुंबई, – दिवाळीच्या पार्श्वभूकमीवर मुंबई पोलिसांकडून मुंबईकरांना सुखद धक्का देण्यात आला आहे. वेगवेगळ्या गुन्ह्यांत चोरीसह गहाळ झालेले 18 कोटी 98 लाख 51 हजार 016 रुपयांचा मुद्देमाल त्यांच्या मूळ मालकांना परत करण्यात आला आहे. आतापर्यंत मुंबई पोलिसांनी 4 हजार 169 मूळ मालकांना त्यांचा मुद्देमाल परत केला असून चालू वर्षांत ही आतापर्यंत सर्वांत मोठी कामगिरी असल्याचे बोलले जाते. चोरीसह गहाळ झालेला मुद्देमाल परत मिळतील अशी कोणतीही शाश्वती नसताना पोलिसांनी अश्रक परिश्रम घेऊन हा मुद्देमाल परत केल्याने या मालकांनी मुंबई पोलिसांच्या आभार व्यक्त केले. हा मुद्देमाल परत मिळाल्याचा आनंद प्रत्येकाच्या चेहर्यावर स्पष्टपणे दिसत होता. दुसरीकडे वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी संबंधित पोलीस अधिकारी आणि कर्मचार्यांच्या उल्लेखनीय कामाचे कौतुक केले होते.
गेल्या काही महिन्यांत विविध गुन्ह्यांत तक्रारदारांचे कोट्यवधी रुपयांचा मुद्देमाल चोरीसह गहाळ झाले होते. याबाबत त्यांनी स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. परिमंडळ बारामधील दहिसर, कस्तुरबा मार्ग, समतानगर, कुरार, दिडोंशी, वनराई आणि आरे पोलीस ठाण्यात अशा अनेक तक्रारी पोलिसांना प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारीची पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी यांनी गंभीर दखल घेत संबंधित गुन्ह्यांतील आरोपींना अटक करुन त्यांच्याकडून जास्तीत जास्त चोरीसह गहाळ मुद्देमाल जप्त करण्याचे आदेश पोलीस ठाण्यांना दिले होते.
या आदेशानंतर पोलिसांनी अशा गुन्ह्यांची उकल करुन आरोपींकडून चोरीचा मुद्देमाल जप्त केला होता. त्यानंतर सर्वच पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचार्यांचे एक विशेष पथक बनविण्यात आले होते. या पथकाने विविध गुन्ह्यांतील आरोपींना अटक करुन त्यांच्याकडून चोरीचा मुद्देमाल जप्त केला होता. चोरीसह गहाळ झालेला मुद्देमाल परत करण्यासाठी पोलिसांकडून एका कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी मूळ मालकांना त्यांचा चोरीसह गहाळ झालेला मुद्देमाल परत करण्यात आला. त्यात 225 तोळे सोन्याचे दागिने, दोन बस, सात रिक्षा, तेरा बाईक, चार लॅपटॉप, 689 मोबाईल तसेच इतर साहित्य असा 3 कोटी 87 लाख 66 हजार 607 रुपयांच्या मुद्देमालाचा समावेश होता. अतिरिक्त पोलीस आयुक्त शशिकुमार मीना, पोलीस उपायुक्त महेश चिमटे यांच्या हस्ते हा मुद्देमाल त्यांच्या मूळ मालकांना देण्यात आला होता. यावेळी सहाय्यक पोलीस आयुक्त मालोजी शिंदे, कैलास बर्वे, विजय भिसे, स्थानिक पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पोलीस अधिकारी आणि कर्मचारी आदी उपस्थित होते.
अशाच अन्य एका कार्यक्रमांत पोर्ट झोनच्या 36 तक्रारदारांना त्यांचा 33 लाख 49 हजार 047 रुपयांचा मुद्देमाल परत करण्यात आला होता. त्यात दोन कार, चार बाईक, तीस मोबाईल, इतर चोरीसह ऑनलाईन फसवणुक झालेल्या सहाजणांना त्यांची रक्कम परत करण्यात आली होती. या कार्यक्रमाला पोलीस उपायुक्त विजयकांत सागर, सहाय्यक पोलीस आयुक्त विश्वनाथ कोळेकर, पंढरीनाथ पाटील, स्थानिक पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पोलीस अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
परिमंडळ नऊ, दहा, पोर्ट झोन सर्वच पोलीस ठाण्याच्या अधिकारी आणि कर्मचार्यांनी उल्लेखनीय काम करुन हा मुद्देमाल हस्तगत केला होता. त्यामुळे या पोलीस अधिकार्यासह कर्मचार्यांचे वरिष्ठांकडून कौतुक करण्यात आले. तसेच वरिष्ठांकडून पोलिसांसह सर्व उपस्थित नागरिकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. विविध गुन्हे उघडकीस आणून चोरीचा मुद्देमाल परत मिळाल्याने नागरिकांनी पोलीस दलाचे आभार व्यक्त केले.
सोमवारी परिमंडळ आठच्या पोलीस ठाण्यातील अधिकार्यांनी अशाच प्रकारे 1 कोटी 66 लाख रुपयांचा चोरीसह गहाळ मुद्देमाल 237 मूळ मालकांना परत केला होता. त्यानंतर परिमंडळ तिन्ही परिमंडळाच्या सुमारे सव्वाचार कोटीचा मुद्देमाल त्यांच्या मूळ मालकांना परत केला आहे.