शेठकडे तक्रार करतो म्हणून पंधरा वर्षांच्या मुलाची हत्या

दोन्ही अल्पवयीन मुलांची डोंगरी बालसुधारगृहात रवानगी

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
21 मार्च 2026
मुंबई, – शेठकडे तक्रार करतो म्हणून नसरुल ऊर्फ रेहान मोहम्मद अफसर शेख या 15 वर्षांच्या मुलाची त्याच्या दोन मित्रांनी तोंड दाबून आणि नंतर गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना अंधेरी परिसरात घडली. याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल होताच पंधरा वर्षाच्या दोन्ही आरोपी मित्रांना डी. एन नगर पोलिसांनी ताब्यात घेतले होते. या दोघांनाही पुढील कारवाईसाठी डोंगरीतील बालसुधारगृहात पाठविण्यात आले आहे. शवविच्छेदन अहवालानंतर या हत्येचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आले.

ही घटना मंगळवारी 17 मार्चला रात्री साडेअकरा ते 18 मार्चला दुपारी दोन वाजता अंधेरीतील डी. एन नगर, एन. दत्ता मार्ग, विनायक टॉवर, गणेशनगरच्या रुम क्रमांक 49 मध्ये घडली. मोहम्मद अफसर फरीद शेख हे सायन हॉस्पिटलजवळील बांधकाम साईटवर राहत असून तिथेच काम करतात. नसरुल ऊर्फ रेहान हा त्यांचा पंधरा वर्षांचा मुलगा आहे. त्याच्यासह दोन्ही आरोपी मुले एका शेठकडे कामाला होते. दिवसभर काम करुन ते तिघेही एकत्र राहत होते.

गेल्या काही दिवसांपासून कामावरुन नसरुल हा दोन्ही आरोपींची शेठकडे सतत तक्रार करत होता. त्याचा त्यांच्या मनात राग होता. याच रागातून त्यांनी नसरुलला गणेशनगरच्या रुम क्रमांक 49 मध्ये बोलाविल होते. तिथेच त्यांनी त्याची तोंड दाबून आणि नंतर गळा आवळून हत्या केली होती. या हत्येनंतर तो पळून गेला होता. बुधवारी दुपारी हा प्रकार उघडकीस येताच स्थानिक रहिवाशांनी ही माहिती डी. एन नगर पोलिसांना दिली. नसरुलला पोलिसांनी तातडीने कूपर हॉस्पिटलमध्ये दाखल केले.

तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्याचा मृतदेह नंतर शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला होता. दोन दिवसांपूर्वीच त्याचा अहवाल पोलिसांना प्राप्त झाला होता. त्यात नसरुलची तोंड दाबून आणि गळा आवळून हत्या झाल्याचे उघडकीस आले होते. या घटनेनंतर पंधरा वर्षांच्या दोन्ही आरोपी मुलांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.

त्यांच्या चौकशीत त्यांनीच नसरुल हा शेठकडे तक्रार करतो याच कारणावरुन त्याची तोंड दाबून आणि नंतर गळा आवळून हत्या केल्याची कबुली दिली. या कबुलीनंतर या दोघांविरुद्ध पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला होता. ते दोघेही अल्पवयीन असल्याने त्यांना नंतर डोंगरीतील बलसुधारगृहात पाठविण्यात आले होते. पंधरा वर्षांच्या मुलाची त्याच्याच पंधरा वर्षांच्या दोन मित्रांनी हत्या केल्याचे समजताच स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड खळबळ उडाली होती.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page