भांडणात मध्यस्थी केली म्हणून बाऊंसरला चाकूने भोसकले
पळून गेलेल्या हल्लेखोराविरुद्ध हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१० जानेवारी २०२४
मुंबई, – भांडणात मध्यस्थी केली म्हणून रागाच्या भरात वसीम अस्लम शेख या ३० वर्षांच्या बाऊंसरवर त्याच्याच परिचित आरोपीने चाकूने भोसकल्याची घटना गुरुवारी रात्री अंधेरी परिसरात घडली. या हल्ल्यात वसीम हा गंभीररीत्या जखमी झाला असून त्याच्यावर कूपर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. याप्रकरणी जहीर ऊर्फ इम्रान पतला हुसैन शेख याच्याविरुद्ध डी. एन नगर पोलिसांनी हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे. हल्ल्यानंतर जहीर हा पळून गेल्याने त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.
वसीम शेख हा अंधेरीतील गावदेवी डोंगर, मकराणी पाड्यात राहत असून तो बाऊंसर म्हणून काम करतो. जहीर हा त्याच्या परिचित असून तो अंधेरीतील डी. एन नगरमध्ये राहतो. गुरुवारी रात्री उशिरा अंधेरीतील दारुसलाम मशिदीजवळ क्षुल्लक कारणावरुन जहीरचे वसीमच्या भावासोबत भांडण झाले होते. या भांडणानंतर त्याने त्याच्या भावाला बेदम मारहाण केली होती. हा प्रकार निदर्शनास येताच वसीमने त्यांच्यातील भांडण मिटविण्यचा प्रयत्न करुन त्यांच्यात भांडणात मध्यस्थी केली होती. त्याचा राग आल्याने जहीरने वसीमच्या पोटात चाकूने भोसकले होते. त्यात वसीम हा गंभीररीत्या जखमी झाला होता.
हल्ल्यानंतर जहीर तेथून पळून गेला होता. रक्तबंबाळ झालेल्या वसीमला स्थानिक रहिवाशांनी तातडीने कूपर हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. त्याची दुखापत गंभीर असल्याने त्याला तिथे दाखल करुन उपचार सुरु करण्यात आले होते. ही माहिती मिळताच डी. एन नगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी वसीमच्या जबानीवरुन पोलिसांनी जहीरविरुद्ध हत्येचा प्रयत्नासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. हल्ल्यानंतर तो पळून गेल्याने त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.