हातचलाखीने सोन्याचे दागिने चोरी करणार्या चार महिलांना अटक
चारही महिला सराईत गुन्हेगार तर सातहून अधिक गुन्ह्यांची नोंद
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
3 एप्रिल 2026
मुंबई, – गर्दीचा फायदा घेऊन पादचार्यांना विशेषता वयोवृद्ध महिलांचे सोन्याचे दागिने हातचलाखीने चोरी करणार्या चार महिलांना डी. एन नगर पोलिसांनी अटक केली. सुशीला राजू शिंदे, दामिनी निमेश शाहा, रोशनी आशिष शिंदे आणि सोनल निखिल मोरे अशी या चौघींची नावे असून त्या मूळच्या नाशिकच्या रहिवाशी आहेत. त्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्यांच्याविरुद्ध अशाच सहा ते सात गुन्ह्यांची नोंद आहे. यातील बहुतांश गुन्ह्यांत त्यांच्यावर अटकेची कारवाई झाली असून जामिनावर बाहेर आल्यानंतर त्या पुन्हा अशा प्रकारचे गुन्हे करत असल्याचे तपास अधिकारी अविनाश दराडे यांनी बोलताना सांगितले. अटकेनंतर चौघांनाही वांद्रे येथील लोकल कोर्टाने एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यांच्या चौकशीतून आणखीन काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
कलावती भागुजी गावडे ही 68 वर्षांची वयोवृद्ध महिला सांताक्रुज येथील ट्रॉन्झिंट कॅम्प, बस डेपो आगार परिसरात राहते. अनेकदा ती दागिने खरेदीसाठी अंधेरी येथे येत होती. 20 मार्चला सायंकाळी तिला अंधेरी मार्केटमध्ये काम होते. त्यामुळे ती सांताक्रुज येथून रिक्षातून अंधेरी मार्केट येथै आली होती. यावेळी एका भांड्यावाल्याचे काही भांडे पडल्याने ती भांडी उचलण्यासाठी खाली वाकली होती. याच दरम्यान तिला तिच्या पर्समधील पाकिट कोणीतरी चोरी केल्याचे दिसून आले. तिथे पाकिटचा शोध घेतला असता त्यात तिला पाकिट दिसले नाही. अज्ञात व्यक्तीने भांडी उचलताना खाली वाकल्यानंतर हातचलाखीने तिची पर्स आणि पर्समधील 50 ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या बांगड्या आणि 50 ग्रॅम वजनाची सोन्याची गळ्यातील दोन पदरी माळ असा सव्वातीन लाखांचा मुद्देमाल चोरी केल्याचे दिसून आले. या घटनेनंतर तिने डी. एन नगर पोलिसांना घडलेला प्रकार सांगून अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार केली होती.
तिच्या तक्रारीनंतर पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला होता. गेल्या काही दिवसांत अशा काही गुन्ह्यांची विविध पोलीस ठाण्यात नोंद झाली होती. त्यामुळे त्याची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मचिंछर यांना तपासाचे आदेश दिले होते. या आदेशानंतर त्यांनी त्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक अविनाश दराडे यांच्याकडे सोपविला होता. हा तपास हाती येताच पोलिसांनी परिसरातील सीसीटिव्ही फुटेज ताब्यात घेऊन आरोपीची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला.
सीसीटिव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीवरुन वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मचिंछर, पोलीस निरीक्षक सचिन खोंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली अविनाश दराडे, सहाय्यक फौजदार प्रशांत बोटे, पोलीस हवालदार रेवन्नाथ बोटे, रोहन बंगाळे, पोलीस शिपाई ऋषिकेश बाबर, प्रसाद वरे, सुमीत पोळ, संग्राम पात्रे, अनिकेत वाकोडे यांनी विरार येथे दोन दिवस पाळत ठेवून सुशीला शिंदे, दामिनी शाहा, रोशनी शिंदे आणि सोनल मोरे या चार महिलांना संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेतले.
चौकशीत त्यांनीच ही चोरी केल्याची कबुली दिली. त्यानंतर या चौघींनाही पोलिसांनी अटक केली. तपासात या चारही महिला मूळच्या नाशिकच्या द्वारकाचे रहिवाशी असून सध्या त्या विरार येथे वेगवेगळ्या ठिकाणी राहतात. हातचलाखीने चोरी करण्यात त्या चौघीही रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे. त्यांच्याविरुद्ध कांदिवली, बोरिवली, मालाड, बीकेसी आणि डी. एन नगर पोलीस ठाण्यात अशाच सहा ते सात गुन्ह्यांची नोंद आहे. यातील बहुतांश गुन्ह्यांत त्यांच्यावर अटकेची कारवाई झाली होती. मात्र जामिनावर बाहेर येताच त्या पुन्हा अशाच प्रकारचे गुन्हे करत होते.
याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर चौघींनाही शुक्रवारी दुपारी वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यांच्याकडून लवकरच चोरीचे सोन्याचे दागिने हस्तगत केले असून त्यांच्या अटकेने अशाच इतर काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या गुन्ह्यांचा तपास पोलीस उपनिरीक्षक अविनाश दराडे हे करत आहेत.