डॉक्टरला मारहाण करणार्या नातेवाईकाविरुद्ध गुन्हा दाखल
महिलेच्या मृत्यूनंतर दोन डॉक्टरांना बेदम मारहाण केली होती
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
9 नोव्हेंबर 2025
मुंबई, – डॉक्टरला मारहाण करणार्या समीर अब्दुल्ला जब्बार शेख या 35 वर्षांच्या आरोपी नातेवाईकाविरुद्ध जुहू पोलिसांनी सरकारी कामात अडथळा आणणे तसेच अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याच गुन्ह्यांत त्याला पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. महिलेच्या मृत्यूनंतर समीरने हॉस्पिटलमध्ये कर्तव्यावर असलेल्या दोन डॉक्टरांना शिवीगाळ करुन बेदम मारहाण केल्याचा आरोप आहे. या मारहाणीच्या घटनेने कूपर हॉस्पिटलमध्ये प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
गौरव प्रविण आनंदगावकर हे डॉक्टर असून अंधेरीतील वर्सोवा, चार बंगला, म्हाडा कॉलनीत राहतात. सध्या ते कूपर हॉस्पिटलमध्ये डॉक्टर म्हणून कार्यरत आहेत. शनिवारी त्यांची रात्रपाळी होती, त्यामुळे ते रात्री कामावर हजर झाले होते. यावेळी हॉस्पिटलमध्ये सईदा अब्दुल्ला जाफर शेख या 57 वर्षांच्या महिलेस उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तिची प्रकृती गंभीर होती, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला होता. ही माहिती नंतर डॉक्टराकडून तिच्या नातेवाईकांना देण्यात आली होती.
सईदा ही समीरची आई असल्याने त्याने डॉक्टरांना आधीच माझ्या आईला बरे केले नाहीतर तुम्हाला सोडणार नाही अशी धमकी दिली होती. त्यात आईच्या मृत्यूची माहिती मिळताच तो प्रचंड संतप्त झाला. त्याने तिथे उपस्थित डॉ. प्रशांत अण्णासाहेब भडके आणि डॉ. करण देसाई यांना शिवीगाळ करुन बेदम मारहाण केली होती. या मारहाणीत त्यांना दुखापत झाली होती. ही माहिती मिळताच जुहू पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. यावेळी पोलिसांनी मध्यस्थी करुन समीरला बाजूला करण्याचा प्रयत्न केला. या घटनेने तिथे प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
रात्री उशिरा गौरव आनंदगावकर यांच्या तक्रारीवरुन जुहू पोलिसांनी समीर शेख याच्याविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणून कर्तव्य बजाविणार्या डॉक्टरांना शिवीगाळ करुन मारहाण करणे या भारतीय न्याय सहितेसह महाराष्ट्र वैद्यकीय सेवा संस्था अधिनियम कायदा कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत त्याला पाहिजे आरोपी दाखविण्यात आले आहे. त्याच्यावर लवकरच अटकेची कारवाई केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.