बोरिवलीतील डॉक्टर महिलेकडे खंडणीची मागणी करुन धमकी

माथाडी युनियनच्या पदाधिकार्‍याविरुद्ध गुन्हा तर एकाला अटक

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
12 जून 2025
मुंबई, – बोरिवलीतील एका डॉक्टर महिलेला खंडणीची मागणी करुन जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. याप्रकरणी माथाडी कामगार संतोष पाटीलसह त्याच्या एका सहकार्‍याविरुद्ध बोरिवली पोलिसांनी खंडणीसाठी जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. क्लिनिकचे इंटेरिअरचे काम बंद पाडून संबंधित आरोपींनी दहा हजार रुपये दिल्याशिवाय पुन्हा काम करता येणार नाही अशी धमकी दिल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच मोबीन मोहम्मद शेख या 25 वर्षांच्या आरोपीस बोरिवली पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

प्राजक्ता अनिरुद्ध गोखले ही महिला डॉक्टर असून ती तिच्या कुटुंबियांसोबत कांदिवलीतील ठाकूर कॉम्प्लेक्स परिसरात राहते. ती स्त्री रोगतंज्ञ तर तिचे पती अनिरुद्ध दिलीप गोखले हे युरोलॉजिस्ट आहेत. त्यांच्या मालकीचे बोरिवली परिसरात एक खाजगी क्लिनिक आहे. मे 2025 साली त्यांनी बाजूच्या इमारतीमध्ये क्लिनिकसाठी एक गाळा खरेदी केला होता. या गाळ्याचे इंटेलिअरचे काम सुरु होते. मंगळवारी प्राजक्ता यांची प्रकृती ठिक नसल्याने त्या साईली हॉस्पिटलमध्ये चेकअपसाठी गेल्या होत्या.

याच दरम्यान त्यांना एका मोबाईलवरुन अनेकदा कॉल आले होते. मात्र त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले होते. इंटेरिअरचे काम पाहण्यासाठी त्या गाळ्याजवळ आले होते. यावेळी तिथे काम करणार्‍या उमाशंकर या कामगाराने एक व्यक्ती गाळ्यात घुसला होता. त्याने शिवीगाळ करुन तिथे सुरु असलेले काम बंद पाडले होते. काम करायचे असेल तर माथाडी युनियनला दहा हजाराची पावती फाडावी लागेल, तरीही काम केल्यास त्यांना जिवे मारण्याची अशी धमकी देऊन तो तेथून निघून गेला होता. त्यामुळे त्यांनी संबंधित मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला होता. यावेळी समोरील व्यक्तीने त्याचे नाव संतोष पाटील असल्याचे सांगून तुम्हाला माथाडी महिती आहे का अशी विचारणा केली. त्याने क्लिनिकमध्ये काम करायचे असेल तर खुशाल करा, त्यापूर्वी माथाडी युनियन पैसे द्यावे लागतील.

क्लिनिकमध्ये माझे माणसे येतील, त्यांना दहा हजार रुपये पावती घेण्यास सांगितले. दहा हजार रुपये दिले नाहीतर त्यांना तिथे काम करता येणार नाही अशी धमकी दिली होती. या घटनेनंतर प्राजक्ता गोखले यांनी घडलेला प्रकार बोरिवली पोलिसांना सांगितला. क्लिनिकचे काम करण्यासाठी संतोष पाटील व त्याच्या सहकार्‍यांनी खंडणीसाठी धमकी दिल्याची तक्रार केली होती. या तक्रारीची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत संबंधित आरोपीविरुद्ध खंडणीची मागणी करुन जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता.

याच गुन्ह्यांत नंतर मोबीन मोहम्मद शेख याला पोलिसांनी अटक केली. सध्या तो पोलीस कोठडीत असून त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. या संपूर्ण प्रकरणात संतोष पाटील याचे नाव समोर आले असून त्याची लवकरच पोलिसांकडून चौकशी करुन जबानी नोंदविण्यात येणार आहे. या चौकशीनंतर त्याच्यावर अटकेची कारवाई होईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page