लग्नाची मागणी घालून ३२ वर्षांच्या डॉक्टर तरुणीचा मानसिक शोषण

सुरक्षारक्षकाच्या मदतीने पकडून आरोपीला पोलिसांच्या स्वाधीन केले

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२२ जानेवारी २०२६
मुंबई, – गेल्या चार वर्षांपासून लग्नाची मागणी घालून विविध मोबाईल क्रमांकावरुन कॉलसह मॅसेज करुन, हॉस्पिटलमध्ये येऊन पत्र पाठवून एका ३२ वर्षांच्या महिला डॉक्टर तरुणीचा मानसिक शोषण केल्याप्रकरणी शिवकुमार वसंत गिरगंटे या आरोपीस आग्रीपाडा पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला नोटीस देऊन सोडून देण्यात आले आहे. विशेष म्हणजे या डॉक्टर तरुणीने नायर हॉस्पिटलच्या सुरक्षारक्षकाच्या मदतीने शिवकुमारला ताब्यात घेऊन आग्रीपाडा पोलिसांच्या स्वाधीन केल्याचे पोलिसांनी सांगितले.

३२ वर्षांची तक्रारादार महिला व्यवसायाने डॉक्टर असून ती सध्या आग्रीपाडा येथील नायर हॉस्पिटलमध्ये एमडी पॅथोलॉजी विभागात शिक्षण घेत आहे. तिचे आई-वडिल मुलुंड परिसरात राहतात. लग्नासाठी तिने लग्न जुळविणार्‍या एका खाजगी संकेतस्थावर स्वतची माहिती दिली होती. ५ मे २०२२ रोजी तिला शिवकुमार गिरगंटे नाव सांगणार्‍या एका व्यक्तीने कॉल केला होता. तिचा मोबाईल क्रमांक तिला संबंधित संकेतस्थावर मिळाल्याचे सांगून त्याने तिला लग्नासाठी प्रपोज केले होते. यावेळी तिने तिला सध्या लग्न करायचे नाही असे सांगून त्याचा फोन कट केला होता. त्यानंतर शिवकुमार हा तिला मॅसेज करु लागला होता. त्यामुळे तिने घडलेला प्रकार तिच्या आई-वडिलांना सांगून त्याचा मोबाईल क्रमांक ब्लॉक केला होता.

गेल्या दोन वर्षांपासून ती नायर हॉस्पिटलमध्ये शिक्षण घेत आहे. याच कालावधीत त्याने तिला दुसर्‍या मोबाईलवरुन कॉल आणि मॅसेज करणे सुरु केले होते. तिने पुन्हा त्याचा मोबाईल क्रमांक ब्लॉक केला होता. तरीही तो तिला सतत वेगवेगळ्या मोबाईलवरुन कॉल करुन तिचा मानसिक शोषण करत होता. १२ सप्टेंबर २०२५ रोजी तिला तिच्या सहकारी डॉक्टराने शिवकुमार नावाचा एक व्यक्ती तिला भेटण्यासाठी आला आहे असे सांगितले होते. तिच्या माहितीसाठी त्याने त्याचा फोटो पाठविला होता. ‘

मात्र तिने त्याला भेटण्यास नकार दिला. तरीही तो तिला भेटण्यासाठी सतत नायर हॉस्पिटलमध्ये येत होता. १० डिसेंबर २०२५ रोजी त्याने तिचे सिनिअर डॉक्टराकडे एक पत्र पाठविले होते. त्यानंतर तो तिला वेगवेगळ्या कर्मचार्‍याच्या माध्यमातून पत्र पाठवून तिचा पाठलाग करत होता. गेल्या काही वर्षांपासून तो तिला सतत कॉल, मॅसेज करत होता, तिला भेटायला नायर हॉस्पिटलमध्ये येत होता. तिला सतत पत्र पाठवत होता. या प्रकाराने ती गेल्या काही दिवसांपासून प्रचंड मानसिक तणावात होती.

बुधवारी सायंकाळी चार वाजता शिवकुमार पुन्हा तिथे आला होता. त्यामुळे तिने तिथे उपस्थित असलेल्या सुरक्षारक्षकाच्या मदतीने शिवकुमारला ताब्यात घेतले आणि त्याला आग्रीपाडा पोलीस ठाण्यात आणले होते. घडलेला प्रकार पोलिसांना सांगून तिने शिवकुमारविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत नंतर त्याला पोलिसांनी अटक केली.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page