व्हिसासाठी डॉक्टर महिलेच्या फसवणुकप्रकरणी गुन्हा दाखल

रिक्षातून प्रवास करताना व्हिडीओ कॉल करणे महागात पडले

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
19 फेब्रुवारी 2025
मुंबई, – लग्न जुळविणार्‍या एका संकेतस्थळावर ओळख झालेल्या डॉक्टर महिलेला लग्नासाठी प्रपोज करुन तिच्याकडून अमेरिकेच्या व्हिसासाठी दोन लाख रुपये घेऊन तिची फसवणुक झाल्याचा प्रकार जुहू परसिरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी मुख्य आरोपीसह त्याची सहकारी महिलेविरुद्ध जुहू पोलिसांनी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. शैलेश पारिख आणि बीना शैलेश पारिख अशी या दोघांची नावे असून या दोघांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. अमेरिकेतील दूतावास कार्यालयात वरिष्ठ अधिकारी असल्याची बतावणी करणारा शैलेशने चुकून व्हिडीओ कॉल केल्यांनतर तो अमेरिकेत नसून मुंबईत एका रिक्षातून प्रवेश करत असल्याचे दिसून आल्यानंतर या प्रकरणाचा पर्दाफाश झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

52 वर्षांची तक्रारदार महिला ही डॉक्टर असून ती जुहू येथे तिच्या वयोवृद्ध वडिलांसोबत राहते. सध्या ती लिलावती हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहे. पंधरा वर्षांपूर्वी तिने एका लग्न जुळविणार्‍या संकेतस्थावर स्वतची माहिती अपलोड केली होती. तिथेच तिची शैलेश पारिखशी ओळख झाली होती. शैलेशने तो अमेरिकेचा रहिवाशी असून दूतावास कार्यालयात वरिष्ठ अधिकारी म्हणून कार्यरत असल्याचे सांगितले होते. त्याचे जुहू परिसरात स्वतच्या मालकीचा एक फ्लॅट आहे. ओळखीनंतर ते दोघेही चांगले मित्र झाले होते. सोशल मिडीयासह मोबाईलच्या माध्यमातून ते दोघेही एकमेकांच्या संपर्कात होते. याच दरम्यान त्याने तिला लग्नासाठी अनेकदा विचारणा केली होती. मात्र तिने त्याला नकार दिला होता. गेल्या वर्षी तिने अमेरिकेत जाण्यासाठी व्हिसासाठी अर्ज केला होता, मात्र तांत्रिक कारणावरुन तिला व्हिसा मिळाला नाही.

शैलेश हा अमेरिकेतील दूतावास कार्यालयात कामाला असल्याने त्याने त्याला मदतीसाठी मॅसेज करुन कॉल केला होता. यावेळी तिने त्याला तिच्या बहिणीचा मुलगा अमेरिकेत एमबीबीएसचे शिक्षण घेत असून त्याच्या मेडीकल कॉलेजमध्ये एक कार्यक्रम आहे. त्यासाठी त्याला व्हिसा हवा असून त्याने तिला व्हिसासाठी मदत करण्याची विनंती केली होती. त्यानंतर त्याने तिची माहिती घेतली होती. ही माहिती घेतल्यानंतर तिला बिना पारिख नावाच्या एका महिलेने कॉल केला होता. यावेळी तिने व्हिसासाठी तिच्याकडे काही पैशांची मागणी केली होती. त्यामुळे तिने तिला ऑनलाईन सात हजार रुपये पाठवून दिले होते. त्यानंतर ती वेळोवेळी तिच्याकडे पैशांची मागणी करत होती. त्यामुळे तिने तिला टप्याटप्याने दोन लाख दोन हजार रुपये पाठविले होते. मात्र तिला व्हिसा मिळाला नव्हता.

शनिवारी 15 फेब्रुवारीला शैलेशचा तिला चुकून व्हिडीओ कॉल आला होता. यावेळी तिला शैलेश हा अमेरिकेत नसून मुंबईतील एका रिक्षातून प्रवास करताना दिसून आला. या प्रकाराने तिला धक्काच बसला होता. अमेरिकेत दूतावास कार्यालयात वरिष्ठ अधिकारी असल्याची बतावणी करुन शैलेशने तिच्याशी मैत्री करुन तिला लग्नासाठी प्रपोज केले होते. तिच्याकडून व्हिसासाठी टप्याटप्याने दोन लाख दोन हजार रुपये घेतले होते. मात्र व्हिसा न देता तिची फसवणुक केली होती.

शैलेश आणि बीनाकडून झालेल्या या फसवणुकीनंतर तिने घडलेला प्रकार जुहू पोलिसांना सांगून या दोघांविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर या दोघांविरुद्ध पोलिसांनी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या तक्रारीची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत जुहू पोलिसांना चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यामुळे या दोन्ही आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page