मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
10 जून 2025
मुंबई, – बकरा विक्रीतून आलेल्या पावणेबाराची कॅश चोरी करुन पळून गेलेल्या एका रिक्षाचालकाला पुण्यातून देवनार पोलिसांच्या एका विशेष पथकाने अटक केली. अरफात मोहम्मद खलुद कुरेशी असे या आरोपी रिक्षाचालकाचे नाव असून तो कुर्ल्याचा रहिवाशी आहे. त्याच्याकडून 9.10 लाखांची कॅश आणि एक मोबाईल असा 9 लाख 28 हजाराचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असून त्याच्याकडून चोरीची उर्वरित रक्कम लवकरच हस्तगत केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
लियाकत झान्नोअली कुरेशी हे मूळचे राजस्थानच्या अजमेर, मदनगंजचे रहिवाशी असून बकरा व्यापारी आहेत. दरवर्षी ते बकरी ईदनिमित्त देवनार येथील बकरा मंडईत बकरे विक्रीसाठी येतात. सालाबादप्रमाणे यंदाही 5 मेला लियाकतअली हे राजस्थान येथून 69 बकरे विक्रीसाठी देवनार येथे आले होते. त्यासाठी त्यांना एस/पाच बाडा, गाळा क्रमांक अकरा ही जागा देण्यात आली होती. शुक्रवारी 6 जूनला एकाच दिवशी त्यांनी 56 बकर्यांची विक्री केली होती. या विक्रीतून त्यांना अकरा लाख रुपये मिळाले होते. त्यांच्याकडे सत्तर हजाराची कॅश होती. अकरा लाख सत्तर हजाराची ही कॅश त्यांनी गाळ्यातील चार्याखाली ठेवली होती. दुसर्या दिवशी त्यांनी ती कॅश काढण्याचा प्रयत्न केला, मात्र तिथे ती कॅश नव्हती. रात्री उशिरा ही कॅश अज्ञात चोरट्याने चोरी करुन पलायन केले होते.
हा प्रकार उघडकीस येताच त्यांनी देवनार पोलिसांना ही माहिती देऊन अज्ञात व्यक्तीविरुद्ध चोरीची तक्रार केली होती. त्यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला होता. या तक्रारीची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत देवनार पोलिसांना तपासाचे आदेश दिले होते. या आदेशानंतर पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी, अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. महेश पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त समीर शेख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक आबूराव सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली विजयकुमार अंबरगे, सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल मोकाटे, पोलीस उपनिरीक्षक अनिल महारनुर, पोलीस हवालदार विनायक तांदळे, सुनिल सोनावणे, संदीप मोहिते यांनी तपास सुरु केला होता.
परिसरातील सीसीटिव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीवरुन या गुन्ह्यांतील आरोपी पुण्याला पळून गेल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली होती. या माहितीवरुन या पथकाने पुण्यातील पिंपरी-चिंचवड परिसरातून अरफात कुरेशी याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीत त्यानेच ही चोरी केल्याची कबुली दिली. अरफात हा कुर्ला येथील कुरेशीनगरचा रहिवाशी असून सध्या तो रिक्षाचालक म्हणून काम करत होता.
गुन्ह्यांच्या दिवशी तो गोवंडी परिसरात आला होता. यावेळी त्याने ही चोरी करुन पलायन केले होते. त्याच्याकडून पोलिसांनी 9 लाख 10 हजार रुपयांची कॅश आणि 18 हजाराचा मोबाईल असा 9 लाख 28 हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे. चोरीच्या गुन्ह्यांत अटक केल्यांनतर त्याला लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याची पोलिसांकडून कसून चौकशी सुरु आहे. त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का याचा पोलीस तपास करत आहेत.