अमेरिकन डॉलर देण्याची बतावणी करुन व्यावसायिकाची फसवणुक
अकरा महिन्यांपासून वॉण्टेड असलेल्या त्रिकुटाला अटक
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
3 मे 2025
मुंबई, – स्वस्तात अमेरिकन डॉलर देण्याची बतावणी करुन एका इलेक्ट्रीक व्यावसायिकाची सहा लाखांची फसवणुक केल्याप्रकरणी एका त्रिकुटाला समतानगर पोलिसांनी अटक केली. शाहिद मेदबुल हक शेख ऊर्फ अब्दुल, नुरालम अयनुल शेख आणि शाहजान इर्शाद शेख अशी या तिघांची नावे असून फसवणुकीच्या याच गुन्ह्यांत ते तिघेही सध्या पोलीस कोठडीत असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील यांनी सांगितले. गुन्हा दाखल होताच ते तिघेही पळून गेले होते, अखेर महिन्यानंतर या तिघांना अटक करण्यात पोलिसांना यश आल्याचे पोलिसांनी सांगितले.
भावेश गुणवंतलाल बारोट हे विरार येथे राहत असून त्यांची स्वतची अंबिका टेडर्स नावाचे एक इलेक्ट्रीक शॉप आहे. त्यांच्या दुकानासमोर अब्दुल सईद हा आंबा विक्रीचा व्यवसाय करत होता. 2020 पासून तो तिथे आंबा विक्रीचे काम करत असल्याने त्याच्यासह त्याचा मित्र फैजुल शेखशी त्यांची चांगली मैत्री झाली होती. मे 2024 रोजी अब्दुलने त्यांना फोन करुन त्याची एक नातेवाईक कांदिवली येथे राहते. तिच्याकडे अमेरिकन डॉलर आहे. ते डॉलर स्वस्तात देतो असे सांगून त्याने त्यांच्याकडून डॉलरच्या बदल्यात भारतीय चलनाची मागणी केली होती. त्यामुळे ते अब्दुलला भेटण्यासाठी कांदिवली येथे गेले होते. यावेळी त्याने त्यांना काही अमेरिकन डॉलर दाखवून त्यांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला होता. त्याने त्यांना त्याच्याकडे अमेरिकन डॉलर असून सर्व डॉलर सहा लाखांमध्ये देण्याचे आमिष दाखविले होते.
स्वस्तात डॉलर मिळत असल्याने त्यांनी त्याच्याशी व्यवहार करण्याचा निर्णय घेतला होता. ठरल्याप्रमाणे 6 जून 2024 रोजी भावेश बारोट हे कांदिवली येथे सहा लाख रुपये घेऊन आले होते. काही वेळानंतर तिथे दोन तरुण आले आणि त्यांनी त्यांना डॉलर देऊन त्यांच्याकडून सहा लाख रुपये घेऊन निघून गेले होते. काही वेळानतर त्यांनी ते बंडल उघडून पाहिले असता त्यात दोन डॉलरच्या आतील कागदामध्ये सामान गुंडालेला दिसून आला. डॉलरच्या नावाने त्यांनी साबन देऊन भावेश बारोट यांची फसवणुक करुन पलायन केले होते. हा प्रकार उघडकीस येताच त्यांनी घडलेला प्रकार समतानगर पोलिसांना सांगितला होता. याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपींचा शोध सुरु केला होता.
ही शोधमोहीम सुरु असताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील यांच्या पथकाने गेल्या अकरा महिन्यांपासून फरार असलेल्या शाहिद शेख ऊर्फ अब्दुल, नुरालम शेख आणि शाहजान शेख या तिघांना पोलिसांनी संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेतले होते. चौकशीत त्यांनीच ही फसवणुक केल्याची कबुली दिली होती. त्यानंतर या तिघांनाही पोलिसांनी अटक करुन गुरुवारी बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर केले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. या तिघांची पोलिसांकडून चौकशी सुरु असून त्यांनी अशाच प्रकारे इतर फसवणुकीचे गुन्हे केले आहेत का याचा पोलीस तपास करत आहेत.