मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
७ एप्रिल २०२४
मुंबई, दि. ७ (प्रतिनिधी) – सुमारे पावणेसहा लाख रुपयांचे अमेरिकन डॉलर घेऊन पळून गेलेल्या बिनांग मनोज व्यास या ३२ वर्षांच्या आरोपीस बोरिवली पोलिसांनी अटक केली. कॅश आणून देतो असे सांगून बिनांग हा पळून गेला होता. याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल होताच त्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते.
किशोर कोलचंद भंडारी हे गोरेगाव परिसरात त्यांच्या वयोवृद्ध आई-वडिल, पत्नी आणि दोन मुलांसोबत राहतात. गोरेगाव येथे त्यांच्या मालकीचे अरिहंत नावाचे एक ज्वेलर्स दुकान आहे. २३ मेला त्यांना एका अज्ञात व्यक्तीने फोन करुन त्याचे नाव करण पटेल असल्याचे सांगितले. त्याला तातडीने अमेरिकन डॉलरची गरज असून त्यांना डॉलर घेऊन त्यांना बोरिवली येथे येण्याची विनंती केली होती. दुसर्या दिवशी त्यांनी त्यांचा कर्मचारी उत्सवकुमार लिंबाच्या याला करण पटेलने दिलेल्या बोरिवलीतील शिंपोली रोड, गौतमनगरच्या सत्र पार्क अपार्टमेंटमध्ये पाठविले होते. उत्सवकुमार हा तिथे गेल्यानंतर त्याला करण पटेल भेटला, त्याने त्याच्याकडून ६८०० अमेरिकन डॉलर घेतले. कॅश आणून देतो असे सांगून त्याने त्याला थांबण्यास सांगितले. मात्र बराच वेळ होऊन तो तिथे पावणेसहा लाखांची कॅश घेऊन आला नाही. त्यामुळे त्याने सोसायटीच्या रहिवाशांकडे करण पटेलविषयी विचारणा केली. यावेळी त्यांनी तिथे करण पटेल नावाचा कोणीही व्यक्ती राहत नसल्याचे सांगितले. या घटनेनंतर त्यांनी ही माहिती किशोर भंडारी यांना सांगितली.
डॉलर एक्सचेंजच्या नावाने संंबंधित व्यक्तीकडून फसवणुक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी बोरिवली पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करुन पळून गेलेल्या आरोपीचा शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असतानाच सीसीटिव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीवरुन बिनांग व्यास याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीत त्यानेच हा गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यानंतर त्याला फसवणुकीच्या गुन्ह्यांत पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली होती.