अमेरिकन डॉलरच्या नावाने गंडा घालणार्या टोळीचा पर्दाफाश
मानखुर्द येथील लॉजमधून चार आरोपींना अटक व कोठडी
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
8 जुलै 2025
मुंबई, – कमी किंमतीत अमेरिकन डॉलर देतो असे सांगून भारतीय चलन घेऊन गंडा घालणार्या एका टोळीचा गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी पर्दाफाश केला. याच गुन्ह्यांत एका मुख्य आरोपीसह चौघांना पोलिसांनी मानखुर्दच्या एका लॉजमध्ये कारवाई करुन अटक केली. अफजलअली रिसायतअली सय्यद, रईस अहमद अब्दुल जब्बार सय्यद, अबिदूर रेहमान मोहुउद्दीन शहा आणि आदिल साहिल खान अशी या चौघांची नावे आहेत. आरोपींकडून पोलिसांनी डॉलरच्या आकाराच्या काळ्या रंगाच्या कागदाचे 42 बंडल, रासायनिक द्रावणाचे पाच लिटर चार कॅन, एक बॉटल, विविध कंपन्याचे वापरते सहा मोबाईल, 30 हजार 600 रुपयांची कॅश असा सव्वालाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. अटकेनंतर या चौघांना किल्ला कोर्टाने शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
मानखुर्द येथील टी जंक्शनजवळ शिवकृपा लॉज आहे. या लॉजमध्ये भारतीय चलनातील नोटांच्या बदल्यात जास्त किंमतीचे डॉलर देतो असे सांगून फसवणुक करणारी टोळी वास्तव्यास असल्याची माहिती गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक धुतराज यांना मिळाली होती. या माहितीनंतर प्रभारी पोलीस निरीक्षक भरत घोणे यांच्यासह त्यांच्या पथकातील पोलीस निरीक्षक सावंत, सहाय्यक पोलीस निरीक्षक धुतराज, चिकणे, पोलीस उपनिरीक्षक रहाणे, माशेरे, सहाय्यक फौजदार देसाई, पोलीस हवालदार जाधव, शिंदे, गायकवाड, भालेराव, पाटसुपे, डाळे, पोलीस शिपाई ससाने, बोढारे, पाटील यांनी शिवकृपा लॉजच्या एका रुममध्ये छापा टाकून चार संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.
चौकशीदरम्यान त्यांची नावे अफजलअली सय्यद, रईस सय्यद, अबिदूर शहा आणि आदिल खान असल्याचे उघडकीस आले. या आरोपींकडून पोलिसांनी डॉलरच्या आकाराचे 42 हून अधिक बंडलसह इतर साहित्य जप्त केले. तपासात ही टोळीने अनेकांना कमी किंमतीत डॉलर देण्याचे आमिष दाखवून समोरील व्यक्तीकडून भारतीय चलन घेत होते. त्यानंतर त्यांना डॉलरच्या नावाने कागदी बंडल देऊन पलायन करत होते. काळा रंग लावलेल्या मूळ डॉलरला रासायनिक द्रावणात बुडवून समोरच्या व्यक्तीला ते डॉलर असल्याचे भासवून डॉलरच्या आकाराचे बंडल देत होते. काही वेळानंतर तेथून पळून गेल्यानंतर संबंधित व्यक्तीला आपली फसवणुक झाल्याचे समजत होते.
अशा प्रकारे फसवणुक करणारी ही एक सराईत टोळी असून या या टोळीने अनेकांना गंडा घातल्याचे उघडकीस आले आहे. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर चारही आरोपींना किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना शुक्रवार 11 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या चौघांची पोलिसांकडून चौकशी सुरु असून या चौकशीतून अशाच फसवणुकीचे काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. या गुन्ह्यांचा तपास धुतराज हे करीत असल्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक भरत घोणे यांनी सांगितले.