डॉलरच्या नावाने गंडा घालणार्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश
तिघांना अटक तर मुख्य आरोपींचा शोध सुरु; अनेक गुन्हे दाखल
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
६ मार्च २०२४
मुंबई, – डॉलरच्या नावाने अनेकांना गंडा घालणार्या एका आंतरराज्य टोळीचा गुन्हे शाखेच्या युनिट आठच्या अधिकार्यांनी पर्दाफाश केला. याप्रकरणी तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली असून त्यांचा मुख्य सहकारी कारवाईपूर्वी पळून गेला. माजिद अब्दुल मलिक खान ऊर्फ मन्नू, मयंक प्रदीप शर्मा ऊर्फ लड्डू आणि आकाश द्वारकाप्रसाद अग्रवाल ऊर्फ कब्बू अशी या तिघांची नावे असून अटकेनंतर त्यांना किल्ला न्यायालयाने मंगळवार १२ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या टोळीने मुंबईसह देशभरातील अनेक शहरात फसवणुकीचे गुन्हे केल्याचे तपासात उघडकीस आल्याचे सहाय्यक पोलीस आयुक्त महेश देसाई यांनी बोलताना सांगितले.
परेश भॅवरलाल परमार यांचा फॉरेक्सचा व्यवसाय असून ते त्यांच्या कुटुंबियांसोबत विलेपार्ले येथे राहतात. त्यांची परेश फॉरेक्स प्रायव्हेट लिमिटेड नावाची एक कंपनी असून या कंपनीत ते त्यांच्या पत्नीसह संचालक म्हणून काम करतात. ही कंपनी विदेशी चलन एक्सचेंजचा व्यवसाय करते. २६ फेब्रुवारीला त्यांच्या विक्रम सिंग या मित्राने त्यांना फोन करुन त्याचा एक मित्र असून त्याचा दिल्लीत टुर्स ऍण्ड ट्रॅव्हेल्सचा व्यवसाय आहे. त्याला काही विदेशी चलनाची गरज आहे असे सांगितले. काही वेळानंतर त्यांना गौरव गोस्वामी या व्यक्तीने फोन करुन त्याला त्यांचा मोबाईल क्रमांक विक्रम सिंग याने दिल्याचे सांगितले. त्याच्या एका मित्राला विदेशात जाण्यासाठी २५ हजारर युएस डॉलरची गरज आहे. त्यामुळे त्याला मदत करण्याची विनंती केली होती. त्यानंतर ते त्यांच्या पत्नीसोबत त्याच्या मित्राला भेटण्यासाठी सांताक्रुज येथील हयात हॉटेलमध्ये गेले होते. तिथे गेल्यानंतर त्याला कृष्णन नावाचा एक तरुण भेटला. त्यालाच युएस डॉलरची गरज असल्याचे सांगून त्याने त्यांना एका रुममध्ये आणले होते.
रुममध्ये गेल्यानतर तिथे अन्य दोन तरुण होते. यावेळी कृष्णनने बॉलीवूडमध्ये दिग्दर्शक म्हणून काम करतो. पूर्वी त्याचा इव्हेंट मॅनेजमेंटचा व्यवसाय होता. याच हॉटेलच्या लॉबीमध्ये अक्षयकुमारचे शूटींग सुरु आहे. अक्षयकुमारला भेटायचे असल्याने त्याने त्यांना तिथे येण्याची विनंती केली होती. त्याला विदेशी चलनाची गरज भासत असल्याने त्यातून त्यांना चांगला फायदा होईल असे सांगून त्याने त्यांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर त्याने त्यांच्याकडून २५ हजार युएस डॉलर घेतले. त्यांचा सहाय्यक आवश्यक कागदपत्रे घेऊन येईल आणि नंतर त्यांना पेमेंट करतो असे सांगून तो रुमबाहेर निघून गेला. मात्र बराच वेळ वाट पाहूनही कृष्णनन तिथे आला होता. त्यामुळे त्यांनी गौरव गोस्वामीला फोन करुन कृष्णननविषयी विचारणा केली होती. त्यालाही कृष्णननविषयी काहीच नव्हती. हा प्रकार त्यांनी त्यांच्या पत्नीला सांगून त्याचा हॉटेलमध्ये शोध घेतला. मात्र तो कुठेच सापडला नाही. सिनेदिग्दर्शक क्षेत्रात कार्यरत असल्याची बतावणी करुन, बोलण्यात गुंतवून कृष्णन हा २१ लाख २५ हजार रुपयांचे युएस डॉलर घेऊन पळून गेला होता. फसवणुकीचा हा प्रकार उघडकीस येताच त्यांनी वाकोला पोलिसांना ही माहिती दिली. त्यांच्या तक्रार अर्जावरुन पोलिसांनी दोन्ही आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविला होता.
या गुन्ह्यांचा वाकोला पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी तपास करत होते. वरिष्ठांच्या आदेशांनतर सहाय्यक पोलीस आयुक्त महेश देसाई, युनिट आठचे प्रभारी पोलीस निरीक्षक लक्ष्मीकांत साळुंखे यांनी त्यांच्या पथकाला तपासाचे आदेश दिले होते. आरोपींची माहिती काढत असताना तांत्रिक माहितीवरुन पोलीस आयुक्त महेश देसाई, प्रभारी पोलीस निरीक्षक लक्ष्मीकांत साळुंखे व त्यांच्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोजकुमार प्रजापती, मधुकर धुतराज, राहुल प्रभू, संग्राम पाटील, पोलीस उपनिरीक्षक विकास मोरे, अरविंद मोरे, पोलीस हवालदार शिरसाट, किणी, काकडे, कुरकुटे, बिडवे, कांबळे, पोलीस शिपाई रहेरे, सटाले, महिला पोलीस शिपाई गायकवाड, भिताडे यांनी वेगवेगळ्या परिसरातून माजिद खान, मयंक शर्मा आणि आकाश अग्रवाल या तिघांना संशयित आरोपी म्हणून चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीत या गुन्ह्यांत तिघांचाही सहभाग उघडकीस आला होता. त्यानंतर त्यांना पोलिसांनी अटक करुन बुधवारी दुपारी किल्ला न्यायालयात हजर केले होते. यावेळी न्यायालयाने त्यांना सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
आतापर्यंतच्या चौकशीत डॉलरच्या नावाने गंडा घालणारी ही एक आंतरराज्य टोळी असू या टोळीचा म्होरक्या कृष्णा ऊर्फ कृष्णन आहे. त्याच्याच सांगण्यावरुन ही टोळी अशाच प्रकारे फसवणुक करत होती. तिन्ही आरोपी ऑनलाईनच्या माध्यमातून कृष्णनच्या संपर्कात होते. कृष्णन हा पंचतारांकित हॉटेलमध्ये राहतो. फसवणुकीसाठी तो अशाच पंचतारांकित हॉटेलची निवड करतो. या हॉटेलमध्ये दोन दरवाजा असलेले सूट बुक करुन तो संबंधित व्यक्तीला विदेशी चलन घेऊन बोलवत होता. त्याच्याकडून विदेशी चलन घेतल्यानंतर कागदपत्राच्या बहाण्याने तसेच भारतीय चलन आणण्याचे कारण सांगून ही टोळी विदेशी चलन घेऊन पळून जात होती. पळून जाताना ही टोळी हॉटेलच्या रुमची चाव्या घेऊन जात होती.
या टोळीने वाकोला आणि एअरपोर्ट पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. एअरपोर्ट येथे त्यांनी एका व्यावसायिकाला तीस लाख रुपयांचे विदेशी चलन घेऊन बोलावून ते चलन घेऊन पलायन केले होते. त्यानंतर त्यांनी वाकोला येथे अन्य एका व्यावसयिकाकडील २१ लाख ५० हजार रुपयांचे विदेशी चलन घेऊन पलायन केले होते. त्यांच्याविरुद्ध मुंबईसह कोलकाता, बंगलोर, दिल्ली आणि इतर शहरात अनेक फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. त्यांच्या अटकेने अशाच इतर काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मयांक हा मुख्य आरोपी कृष्णन याचा भाचा आहे. त्याच्या अटकेनंतर कृष्णन हा पळून गेल्याने त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
या कामगिरीबाबत पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त लखमी गौतम, अतिरिक्त पोलीस आयुक्त शशिकुमार मीना यांनी सहाय्यक पोलीस आयुक्त महेश देसाई, प्रभारी पोलीस निरीक्षक लक्ष्मीकांत साळुंखे व त्यांच्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोजकुमार प्रजापती, मधुकर धुतराज, राहुल प्रभू, संग्राम पाटील, पोलीस उपनिरीक्षक विकास मोरे, अरविंद मोरे, पोलीस हवालदार शिरसाट, किणी, काकडे, कुरकुटे, बिडवे, कांबळे, पोलीस शिपाई रहेरे, सटाले, महिला पोलीस शिपाई गायकवाड, भिताडे यांचे कौतुक केले आहे.