मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
19 मार्च 2025
मुंबई, – अनैतिक संबंधाला अडसर असलेल्या पतीची पत्नीचे प्रियकरासह त्याच्या दोन मित्रांच्या मदतीने गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना गोरेगाव परिसरात उघडकीस आली आहे. चंद्रशेखर रामसिंग चौहाण असे या 35 वर्षीय हत्या झालेल्या पतीचे नाव आहे. याप्रकरणी चंद्रशेखरची पत्नी रंजू ऊर्फ रंजना चंद्रशेखर चौहाण, तिचा प्रियकर शाहरुख खान, त्याचे दोन मित्र शिवदास आणि मैनूद्दीन लतिक खान अशा चौघांविरुद्ध दिडोंशी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या आरोपी पत्नी रंजू चौधरी आणि मैनूद्दीन खान या दोघांना काही तासांत पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत ते दोघेही पोलीस कोठडीत आहे. पळून गेलेल्या शाहरुख आणि शिवरामचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. मंगळवारी उघडकीस आलेल्या या हत्येच्या घटनेने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड खळबळ उडाली होती.
ही घटना शनिवारी 15 मार्चला रात्री पावणेतीन वाजता गोरेगाव येथील जनरल अरुणकुमार वैद्य मार्गावरील बंजारीपाडा, हमुलाल सेवा मंडळात घडली. याच ठिकाणी चंद्रशेखर हा त्याच्या पत्नी रंजूसोबत राहत होता. तिचे त्याच परिसरात राहणार्या शाहरुख खान याच्यासोबत अनैतिक संबंध होते. या दोघांच्या प्रेमसंबंधाला चंद्रशेखर हा अडसर होता. त्यामुळे त्यांनी त्याच्या हत्येची योजना बनविली होती. याकामी शाहरुखने त्याचे दोन मित्र शिवदास आणि मैनूद्दीनची मदत घेतली होती. ठरल्याप्रमाणे शनिवारी रात्री उशिरा ते तिघेही चंद्रशेखर याच्या घरी आले होते. त्यानंतर या तिघांनी रंजूच्या मदतीने चंद्रशेखरची गळा आवळून हत्या केली होती. या हत्येनंतर ते चौघेही पळून गेले होते. मंगळवारी हा प्रकार उघडकीस येताच दिडोंशी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती.
चंद्रशेखरला जोगेश्वरीतील ट्रॉमा केअर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले होते. त्यानंतर त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला, त्याचा अहवाल नंतर पोलिसांना प्राप्त झाला. त्यात त्याची गळा आवळून हत्या करण्यात आल्याचे नमूद करण्यात आले होते. शवविच्छेदन अहवालानंतर पोलीस उपनिरीक्षक तुषार सारंग यांच्या तक्रारीवरुन दिडोंशी पोलिसांनी चंद्रशेखरची पत्नी रंजू चौहाण, प्रियकर शाहरुख खान, दोन मित्र शिवदास आणि मैनूद्दीन यांच्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला होता.
गुन्हा दाखल होताच आरोपीच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही शोधमोहीम सुरु असताना आरोपी पत्नी रंजू, प्रियकराचा मित्र मैनुद्दीन या दोघांना पोलिसांनी अटक केली. शाहरुख आणि शिवराम हे दोघेही पळून जाण्यात यशस्वी झाले असून त्यांचा पोलीस शोध घेत आहेत.