मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१७ डिसेंबर २०२४
मुंबई, – सुमारे पावणेपाच कोटीच्या कोकेनसह एका ४५ वर्षांच्या ऑफिस बॉयला डोंगरी पोलिसांनी अटक केली. इम्रान याकूब शेख ऊर्फ जुम्मा असे या आरोपीचे नाव असून त्याच्याकडून पोलिसांनी ९४० ग्रॅम वजनाचे कोकेनसह बाईक जप्त केली आहे. जुम्मा हा एका बिल्डरकडे ऑफिस बॉय म्हणून नोकरी करत असून पार्टटाईम ड्रग्ज पुरविण्याचेही काम करत होता. अटकेनंतर त्याला लोकल कोर्टाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याच्या चौकशीतून या कटातील मुख्य आरोपींची नावे समोर आली असून त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र व्हनकोटी यांनी सांगितले.
गेल्या काही दिवसांत डोंगरी परिसरात ड्रग्ज तस्करीच्या गुन्ह्यांत लक्षणीय वाढ झाली होती. त्याची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत डोंगरी पोलिसांना अशा ड्रग्ज तस्कराविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश दिले होते. या आदेशानंतर अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. अभिनव देशमुख, पोलीस उपायुक्त डॉ. प्रविण मुंढे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र व्हनकोटी यांच्या पथकातील पोलीस निरीक्षक अतुल सोनावणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक परिमल पाटील, पोलीस उपनिरीक्षक वसीम पटेल, सहाय्यक फौजदार गणेश चौधरी, पोलीस हवालदार अजिम मुलानी, पोलीस शिपाई नितीन शिंदे, जयेश गोळे, दगडू तडवी यांनी अशा आरोपींविरुद्ध विशेष मोहीम हाती घेतली होती.
सोमवारी एटीएसचे परिमल पाटील, मुलानी, शिंदे आदीचे पथक परिसरात गस्त घालत होते. डोंगरीतील निशानपाडा क्रॉस लेन, सुपारीवाला इमारतीसमोर गस्त घालताना पोलिसांना एक बाईकस्वार संशयास्पद फिरताना दिसून आला होता. त्यामुळे त्याला पोलिसांनी थांबण्याचा इशारा केला होता, मात्र पोलिसांना पाहताच तो पळू लागला. यावेळी त्याला या पथकाने पाठलाग करुन करुन चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्याच्यासह बाईकच्या डिक्कीची तपासणी केल्यानंतर त्यात या अधिकार्यांनी ९४० ग्रॅम वजनाचे कोकेन सापडले. या कोकेनची किंमत ४ कोटी ७० लाख रुपये इतकी आहे. या कोकेनसह २० हजाराची बाईक पोलिसांनी जप्त केली.
चौकशीत अटक आरोपीचे नाव इम्रान शेख ऊर्फ जुम्मा असल्याचे उघडकीस आले. तो डोंगरीतील सिद्धी मोहल्ला, रजाक इमारतीच्या तिसर्या मजल्यावरील फ्लॅट क्रमांक सहामध्ये राहत होता. सध्या तो एका बिल्डरकडे ऑफिस बॉय म्हणून काम करत होता. झटपट पैशांसाठी तो ड्रग्ज तस्करीत सक्रिय झाला होता. पार्टटाईम म्हणून तो ड्रग्ज पुरविण्याचे काम करत होता. सोमवारी तो कोकेनचा साठा डिलीव्हरीसाठी आला होता, मात्र त्यापूर्वीच त्याला पोलिसांनी अटक केली. त्याच्याविरुद्ध पोलीस उपनिरीक्षक नितीन शिंदे यांच्या तक्रारीवरुन डोंगरी पोलिसांनी एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता.
याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर त्याला मंगळवारी दुपारी लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला २१ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु असून या चौकशीतून अनेक धक्कादायक खुलासे करण्यात पोलिसांना यश आले आहे. त्याच्या चौकशीतून मुख्य आरोपीसह त्याच्या इतर सहकार्यांची नावे समोर आली आहे. त्यामुळे या आरोपीच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.