पंधरा कोटीच्या कोकेन ड्रग्जप्रकरणी तीन मुख्य आरोपींना अटक
सप्टेंबर महिन्यांत हॉटेलमध्ये सापडला होता कोकेनचा साठा
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
14 नोव्हेंबर 2025
मुंबई, – सुमारे पंधरा कोटीच्या कोकेन ड्रग्जप्रकरणी तीन मुख्य आरोपींना डोंगरी पोलिसांनी अटक केली. तरुण कपूर, साहिल अत्तारी आणि हिमांशू शाह अशी या तिघांची नावे असून त्यांच्याविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. अटकेनंतर तिन्ही आरोपींना लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या कारवाईत सप्टेंबर महिन्यांत डोंगरी पोलिसांनी पंधरा कोटीचे तीन किलो कोकेनचा साठा केला होता, याच गुन्ह्यांत आताा आरोपींवर कारवाई करण्यात आली आहे.
डोंगरी येथे सबीना नावाचे एक गेस्ट हाऊस आहे. या गेस्ट हाऊसमध्ये एक तरुण राहत असून त्याने तिथे कोकेनचा साठा लपवून ठेवला असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक परिमल पाटील यांना मिळाली होती. वरिष्ठांना ही माहिती सांगितल्यानंतर त्यांनी संबंधित तरुणावर कारवाईचे आदेश दिले होते. या आदेशानंतर पोलीस आयुक्त देवेन भारती, अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. अभिनव देशमुख, पोलीस उपायुक्त डॉ. प्रविण मुंढे, सहाय्यक पोलीस आयुक्त तन्वीर शेख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोंडुराम बांगर, पोलीस निरीक्षक मिनीनाथ वाळेकर यांच्या पथकातील सहाययक पोलीस निरीक्षक अनिल रोकडे, परिमल पाटील, प्रदीप लाड, पोलीस हवालदार साबळे, राजेंद्र कदम, अजीत मुलानी, सुनिल देशमुख, रांजणे, पोलीस शिपाई गोळे, पाटील यांनी सबीना गेस्ट हाऊसमधील संबंधित रुममध्ये छापा टाकला होता.
या रुममधून पोलिसांनी तीन किलो कोकेनचा साठा जप्त केला होता. त्याची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत सुमारे पंधरा कोटी रुपये होती. या रुममध्ये तरुण कपूर हा 26 वर्षांचा तरुण राहत होता. त्यानेच ते कोकेन तिथे विक्रीसाठी आणले होते, मात्र पोलीस कारवाईपूर्वीच तो तेथून पळून गेला होता. तपासात तरुण हा हिमाचलप्रदेशचा रहिवाशी असून त्याचा पासपोर्टसह इतर साहित्य पोलिसांनी जप्त केले होते. तरुणला ते कोकेन साहिल आणि हिमांशू यांनी दिले होते. ते कोकेन त्यांनी इथिपोपिया या आफ्रीकन देशातून तस्करी करुन आणले होते. तरुण हा मुंबईला तर हिमांशू व साहिल चेन्नईला गेले होते.
चेन्नईला या दोघांना नारकोटीक्स कंट्रोल ब्युरोच्या अधिकार्यांनी अटक केली होती. यावेळी त्यांच्याकडून या अधिकार्यांनी पाच किलो कोकेनचा साठा जप्त केला होता. त्याची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत सुमारे पचवीस लाख रुपये इतकी होती. याच गुन्ह्यांत ते दोघेही पुडल कारागृहात होते. त्याचा प्रोडेक्शन वॉरंट घेतल्यांनतर पोलिसांनी ताबा घेतला होता. त्यापूर्वी पोलिसांनी तरुण कपूरला ताब्यात घेतले होते. या तिघांनाही कोकेन तस्करीच्या गुन्ह्यांत अटक करण्यात आली असून ते सध्या पोलीस कोठडीत आहेत.