व्यावसायिकाला खंडणीसाठी धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल
मृत भावाच्या आयकार्डचा गैरवापर करुन पैशांसाठी मागणी
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१६ फेब्रुवारी २०२५
मुंबई, – महानगरपालिकेत असलेल्या मृत भावाच्या आयकार्डचा गैरवापर करुन स्थानिक व्यावसायिकांना धमकावून त्याच्याविरुद्ध दाखल केलेली मागे घेण्यासाठी डोंगरीतील एका व्यावसायिकाला दहा लाखांच्या खंडणीसाठी धमकी देण्यात आली आहे. याप्रकरणी मुद्दसर शब्बीर भालदार या आरोपीविरुद्ध डोंगरी पोलिसांनी खंडणीसाठी धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांत त्याला पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.
अली मेहंदी जावेद आबेदी हे व्यावसायिक असून ते त्यांच्या कुटुंबियांसोबत डोंगरीतील जेल रोड परिसरात राहतात. याच परिसरात त्यांच्या मालकीचे एक शॉप आहे. मुद्दसर हा त्यांच्या परिचित असून तो डोंगरी परिसरात राहतो. त्याचा भाऊ मुझम्मील याचे निधन झाले असून तो पूर्वी महानगरपालिकेत कामाला आहे. स्वतच्या भावाचा आयकार्डचा गैरवापर करुन तो स्थानिक दुकानदारांना त्यांचे शॉप अनधिकृत असल्याची बतावणी करुन त्यांना धमकी देत होता. त्यांच्याकडून कारवाई न करण्यासाठी पैशांची मागणी करत होता. हा प्रकार लक्षात येताच अली आबेदी यांनी मुद्दसरविरुद्ध डोंगरी पोलिसांत तक्रार करुन त्याच्याविरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली होती. त्याच्याविरुद्ध अली आबेदी यांच्याकडून तक्रार झाल्याचे समजताच तो प्रचंड संतापला होता. त्यामुळे त्याने त्यांना तक्रार मागे घेण्यासाठी तसेच त्यांच्या शॉपविरुद्ध तक्रार करुन ते शॉप तोडण्याची धमकी दिली होती.
ही कारवाई न करण्यासाठी त्याने त्यांच्याकडे दहा लाखांच्या खंडणीची मागणी करुन त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली होती. या धमकीनंतर त्यांनी मुद्दसर भालदारविरुद्ध पुन्हा डोंगरी पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी खंडणीसाठी धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.