मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
27 मार्च 2025
मुंबई, – साठ वर्षांच्या वयोवृद्ध व्यापार्याला त्याच्याच पहिल्या पत्नीच्या 24 वर्षांच्या कॉलेज तरुण असलेल्या मुलाने दहा लाखांच्या खंडणीसाठी धमकी दिल्याचा प्रकार डोंगरी परिसरात उघडकीस आला आहे. दहा लाख रुपये दिले नाहीतर त्यांचे अश्लील फोटो गल्ली न्यूजसह सोशल मिडीयावर व्हायरल करुन त्यांची बदनामीची धमकीच या मुलाने दिली होती. याप्रकरणी या व्यापार्याच्या तक्रारीवरुन आरोपी मुलाविरुद्ध डोंगरी पोलिसांनी खंडणीसाठी धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
यातील तक्रारदार वयोवृद्ध व्यवसायाने व्यापारी असून ते डोंगरी परिसरात त्यांच्या कुटुंबियांसोबत राहतात. आरोपी हा त्यांचा पहिल्या पत्नीचा मुलगा असून तो सध्या कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहे. 7 मार्चला ते त्यांच्या घरी होते. यावेळी तिथे आरोपी आला होता. त्याने त्यांच्या प्रेयसीसोबतचे काही अश्लील फोटो असल्याचा दावा केला होता. ते फोटो गल्ली न्यूजमध्ये देऊन त्यांना एक्सोज करण्याची धमकी दिली होती. पैशांची व्यवस्था करा नाहीतर ते सर्व फोटो सोशल मिडीयावर व्हायरल करुन त्यांची बदनामीची धमकी दिली होती. सुरुवातीला त्यांनी त्याच्या धमकीकडे दुर्लक्ष केले होते, मात्र तो त्यांना खंडणीसाठी सतत धमकी देत होता.
7 मार्च ते 25 मार्च 2025 या कालावधीत त्याने त्यांना अनेका कॉलवरुन खंडणीसाठी धमकी दिली होती. या धमक्यांना कंटाळून त्यांनी पोलिसांत तक्रार करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे त्यांनी डोंगरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगून आरोपी मुलाविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर 24 वर्षांच्या आरोपी मुलाविरुद्ध पोलिसांनी खंडणीसाठी धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. याच गुन्ह्यांत त्याला पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.