डोंगरी येथे दोन बंधूंवर अल्पवयीन मुलांवर प्राणघातक हल्ला
घरात प्रवेश केलेल्या मुलांना जाब विचारला म्हणून घडलेला प्रकार
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
५ जानेवारी २०२४
मुंबई, – डोंगरी येथे दोन बंधूंवर चारजणांच्या टोळीने प्राणघातक हल्ला केल्याची घटना उघडकीस आली आहे. या हल्ल्यात सहादत हुमायत शेख आणि त्याचा मावस भाऊ फैरुल शेख हे दोघेही जखमी झाले असून त्यांना जे. जे हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी डोंगरी पोलिसांनी हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा नोंदवून चारही आरोपींना ताब्यात घेतले आहे. अटक आरोपी सोळा ते सतरा वयोगटातील असल्याने या चौघांनाही पुढील कारवाईसाठी डोंगरी बालसुधारगृहात पाठविण्यात आले आहे. घरात प्रवेश केलेल्या मुलांना जाब विचारला म्हणून या चौघांनी हा हल्ला केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
सहादत हा २३ वर्षांचा तरुण डोंगरीतील वाडीबंदर, सोलापूर स्ट्रिट परिसरात राहत असून त्याचा नारळ पाणी विक्रीचा धंदा आहे. शनिवारी सकाळी एक आरोपी त्याच्या घरात घुसला होता. तो सर्व सामान पाहून काहीतरी शोधत असल्याचे सहादतच्या निदर्शनास आले. त्यामुळे त्याने त्याला त्याच्या घरात काय करतोस अशी विचारणा करुन त्याला घरातून बाहेर काढले होते. त्याचा राग आल्याने त्याने त्यांनाच शिवीगाळ करुन लाथ्याबुक्यांनी मारहाण केली होती. यावेळी त्याने जिवे मारण्याच्या उद्देशाने सहादतवर चाकूने वार केले. त्यात त्याला किरकोळ दुखापत झाली. नंतर त्याने त्याचा मावस भाऊ फैरुलवर प्राणघातक हल्ला केला. त्यात त्याच्यस डोळ्याला आणि पोटाला गंभीर दुखापत झाली होती. अचानक झालेल्या आरडाओरडानंतर तिथे स्थानिक लोक जमा झाले होते. यावेळी आरोपीसह इतरांनी त्यांना चाकूचा धाक दाखवून कोई बीच मे आया तो उसे भी जान से मार दूंगा अशी धमकी दिली होती. त्यानंतर ते पळून गेले होते.
चाकू हल्ल्यात जखमी झालेल्या सहादत आणि फैरुल या दोघांनाही स्थानिक रहिवाशांनी तातडीने जवळच्या जे. जे हॉस्पिटलमध्ये दाखल केले. फैरुलची दुखापत गंभीर असल्याने त्याला तिथे दाखल करण्यात आले. त्याच्यावर उपचार सुरु असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितले. सहादतला प्राथमिक उपचारानंतर सोडून देण्यात आले. ही माहिती मिळताच डोंगरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी सहादतच्या जबानीवरुन पोलिसांनी चारही अल्पवयीन मुलांविरुद्ध हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या चौघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. ते अल्पवयीन असल्याने त्यांना डोंगरीतील बालसुधारगृहात पाठविण्यात आले आहे.