त्या महिलेसाठी निर्भया पथकाचे पोलीस बनले देवदूत
बॅनर-ताडपत्री लावून रस्त्यावरच केली गरोदर महिलेची प्रसुती
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२० सप्टेंबर २०२४
मुंबई, – प्रसुतीसाठी जाणार्या त्या महिलेसाठी डोंगरी पोलीस ठाण्याच्या निर्भया पथकाचे पोलीस देवदूत बनले. जे. जे हॉस्पिटलमध्ये जाताना अचानक प्रसुती कळा आल्यानंतर निर्भया पथकातील महिला अधिकारी आणि कर्मचार्यांनी आजूबाजूच्या बॅनर-ताडपत्री गोळा करुन या गरोदर महिलेची रस्त्यावरच प्रसुती केली. या महिलेने एका गोंडस मुलाला जन्म दिला होता. महिलेसह तिच्या बाळाला जे. जे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती ठणठणीत आहे. डोंगरी पोलिसांच्या निर्भया पथकातील महिला कर्मचार्यासह अन्य पोलिसांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सदानंद माने यांच्यासह अनेक मान्यवरांनी कौतुक केले आहे. या सर्व पोलिसांचे स्वत पोलीस आयुक्त विवेक फणसळकर भेट घेऊन त्यांचा सत्कार करणार असल्याचे बोलले जाते.
मुंबई पोलिसांचे जगभरात लौकीक आहे. रस्ते अपघात असो किंवा दुर्धर आजार असो पोलीस नेहमीच गरजू लोकांच्या मदतीसाठी जातात. मग तो कुठल्या जातीपाती असो. संबंधित व्यक्तीला मदत करणे हाच त्यांचा धर्म असतो. अशीच एक घटना शुक्रवारी डोंगरी परिसरात घडली. शुक्रवारी सकाळी साडेअकरा ते सव्वाच्या सुमारास डोंगरी पोलीस ठाण्याचे निर्भया पथकातील अधिकारी आणि कर्मचारी परिसरात गस्त घालत होते. ही गस्त सुरु असताना या पथकाला डोंगरीतील चार नाळ जंक्शन येथील रस्त्यावर एक महिलेला अचानक प्रसुतीच्या वेदना होऊ लागल्या. ही महिला रक्ताने भरलेली होती. हा प्रकार निदर्शनास येताच निर्भया पथकाच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक रत्ना खंडेलवाल, महिला पोलीस शिपाई गुजर, जाधव, पोलीस हवालदार फड, राऊत, पोलीस शिपाई सोनावणे यांनी आजूबाजूला असलेल्या बॅनर-ताडपत्री एकत्र या महिलेला कव्हर केले. यावेळी तिथे आलेल्या एका महिलेच्या मदतीने संबंधित महिला पोलिसांनी तिची डिलीव्हरीसाठी मदत केली होती. यावेळी तिने एका गोंडस बाळाला जन्म दिला. महिलेचे प्रचंड ब्लडिंग होत असल्याने पोलिसांनी १०८ क्रमांकावर संपर्क साधून मेडीकल फॅसिलिटीची मागितली. मात्र बराच वेळ होऊन रुग्णवाहिका आली नाही. त्यामुळे क्षणाचा विलंब न लावता या पोलिसांनी मोबाईल व्हॅनमधून तिच्यासह तिच्या बाळाला जे. जे हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तिथेच त्यांच्यावर नंतर उपचार सुरु करण्यात आले. या दोघांची प्रकृती आता स्थिर आहे.
प्राथमिक तपासात या महिलेचे नाव सलमा असून ती कळवा येथील रहिवाशी आहे. तिला सकाळीच प्रसुतीच्या वेदना होऊ लागले होते. त्यामुळे ती कळवा येथून सॅण्डहर्ड रोड रेल्वे स्थानकात आली होती. तेथून ती चालत जे. जे हॉस्पिटलच्या दिशेने जात होती. यावेळी तिला अचानक जोरात प्रसुती वेदना होऊ लागल्या. रस्त्यावर प्रसुती होत असल्याचे लक्षात निर्भया पथकातील महिला अधिकारी, कर्मचार्यांनी तातडीने तिची रस्त्यावर डिलीव्हरी करुन तिच्यासह तिच्या बाळाला जे. जे हॉस्पिटलमध्ये दाखल केले. ही माहिती नंतर तिच्या पतीला देण्यात आली होती. या माहितीनंतर तो काही वेळात हॉस्पिटलमध्ये आला होता. त्याने निर्भया पथकातील सर्व महिला पोलीस अधिकारी आणि कर्मचार्यांचे आभार व्यक्त केले होते. या कामगिरीचे वरिष्ठ पोलीस अधिकार्यांसह वरिष्ठ पोलीस निरीक्षक सदानंद माने यांनीही कौतुक केले आहे. स्वत पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी डोंगरी पोलीस ठाण्याच्या निर्भया पथकाने केलेल्या उल्लेखनीय कामगिरीचे कौतुक करुन त्यांचे अभिनंदन केले होते.