मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१४ जून २०२४
मुंबई, – दुप्पट रक्कमेच्या आमिषाने एका व्यक्तीची सुमारे अकरा लाखांची फसवणुक झाल्याचा प्रकार अंधेरी परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी एका महिलेसह दोघांविरुद्ध अंधेरी पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. राहुल माने आणि वैशाली वाघमारे अशी या दोघांची नावे असून या दोघांनी अशाच प्रकारे इतर काही लोकांना दुप्पट रक्कमेचे आमिष दाखवून त्यांची फसवणुक केल्याचे बोलले जाते. त्यामुळे या दोघांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
रविंद्र हनुमंत गोसावी हे वाळेश्वर येथील राजभवनमध्ये कर्मचार्यासाठी असलेल्या वसाहतीत राहतात. त्यांची आई लता गोसावी ही राजभवन येथे माळीचे काम करते तर त्यांचा गॅस सेफ्टी डिव्हाईस विक्रीचा व्यवसाय आहे. एप्रिल २०२३ रोजी त्यांची वर्सस्टाईल अटायर सोल्यूशन प्राव्हेट लिमिटेड कंपनीचे संचालक वैशाली वाघमारे आणि राहुल माने यांच्याशी ओळख झाली होती. या कंपनीचे अंधेरी एक कार्यालय असून याच कार्यालयात ते दोघेही काम करतात. यावेळी या दोघांनी त्यांना कंपनीच्या काही गुंतवणुक योजनेची माहिती दिली होती. त्यातील एका योजनेत गुंतवणुक केल्यास त्यांना दहा महिन्यांत दुप्पट रक्कम मिळेल असे सांगण्यात आले होते. या योजनेत अनेकांनी मोठ्या प्रमाणात गुंतवणुक केली असून त्यांनीही गुंतवणुक करावी अशी विनंती या दोघांनी केली होती. योजनेची माहिती घेतल्यानंतर त्यांनी दहा महिन्यांत दामदुप्पट योजनेत अकरा लाख एकोणीस हजाराची गुंतवणुक केली होती. तीन महिन्यानंतर त्यांना ४५ हजार रुपये मिळाले होते, मात्र नंतर त्यांना कंपनीने व्याजाची रक्कम देणे बंद केले होते. याबाबत त्यांनी कंपनीत जाऊन विचारणा केली असता निकिता नावाच्या एका महिलेने कंपनीत काही प्रॉब्लेम झाला असून लवकरच त्यांची गुंतवणुकीसह व्याजाची रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा होईल असे सांगितले.
मात्र एक वर्ष उलटूनही त्यांनी पैसे बँक खात्यात जमा केले नाही. चौकशीनंतर वैशाली आणि राहुल हे दोघेही कंपनीला टाळे लावून पळून गेल्याचे त्यांना समजले. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी अंधेरी पोलिसात तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर वैशालीसह राहुल माने या दोघांविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. ते दोघेही पळून गेल्याने त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. त्यांच्याकडे अनेकांनी मोठ्या प्रमाणात गुंतवणुक केल्याचे बोलले जाते. त्यामुळे फसवणुकीचा हा आकडा आणखीन वाढण्याची शक्यता वर्तविण्यत येत आहे.