मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
22 एप्रिल 2025
मुंबई, – वीस महिन्यांत गुंतवणुक केलेली रक्कम दुप्पट करुन देतो असे सांगून एका व्यावसायिकाची सुमारे साडेअठरा लाखांची फसवणुक झाल्याचा प्रकार कांदिवली परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी संतोषकुमार भगवान सिंग या भामट्याविरुद्ध कांदिवली पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. संतोषकुमार हा पळून गेल्याने त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. त्याने अशाच प्रकारे इतर काही लोकांना दुप्पट रक्कमेचे आमिष दाखवून गंडा घातल्याचे बोलले जाते.
फारुख चाने मणिहार हे व्यावसायिक असून ते कांदिवलीतील परिसरात राहतात. सहा वर्षांपूर्वी त्यांची संतोषकुमारशी ओळख झाली होती. या ओळखीनंतर त्यांची मैत्री झाली होती. संतोषकुमारने त्याच्या मालकीची गोगेर्टन म्युचअल बेनिफिटस निधी लिमिटेड नावाची एक कंपनी असल्याचे सांगितले होते. या कंपनीत त्यांना गुंतवणुक करण्याचा सल्ला देत त्याने त्यांना वीस महिन्यांत गुंतवणुक रक्कम दुप्पट करुन देतो असे आमिष दाखविले होते. त्याच्या आमिषाला बळी पडून त्यांनी त्याच्या कंपनीत टप्याटप्याने साडेअठरा लाखांची गुंतवणुक केली हेती. मात्र पाच वर्ष उलटूनही त्याने त्यांना दुप्पट रक्कम करुन दिले नाही किंवा गुंतवणुक केलेली मूळ रक्कम परत केली नव्हती.
वारंवार विचारणा करुनही तो त्यांना विविध कारण सांगून टाळण्याचा प्रयत्न करत होता. त्याच्याकडून फसवणुक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी कांदिवली पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर संतोषकुमार सिंग याच्याविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होण्यापूर्वीच संतोषकुमार हा पळून गेल्याने त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.