दुप्पट रक्कमेचे आमिष दाखवून पुण्यातील वकिलाची फसवणुक

२५ लाखांची कॅश घेऊन आरोपींचे पलायन; दोघांविरुद्ध गुन्हा

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२८ मे २०२४
मुंबई, – दुप्पट रक्कमेचे आमिष दाखवून पुण्यातील एका वकिलाकडील सुमारे २५ लाख रुपयांची कॅश घेऊन दोघांनी पलायन केल्याची घटना घाटकोपर परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी देवा या मुख्य आरोपीसह त्याच्या सहकार्‍याविरुद्ध पार्कसाईट पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. सीसीटिव्ही फुटेजच्या मदतीने पळून गेलेल्या आरोपीच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

पोपट तेजराज गांधी हे मूळचे पुण्याच्या बारामती, भिगवण रोडचे रहिवाशी आहेत. त्यांची स्वतची शेती असून ते व्यवसायाने वकिल आहेत. काही दिवसात ते त्यांचा चालक लक्ष्मण भोसले याच्यासोबत मुंबईत आले होते. यावेळी त्यांची देवा नावाच्या एका व्यक्तीशी ओळख झाली होती. या ओळखीत त्याने तो त्यांना बारामती येथे भेटल्याचे सांगितले होते. त्याने त्यांना दुप्पट रक्कमेचे आमिष दाखविले होते. मात्र त्याकडे त्यांनी दुर्लक्ष केले होते. त्यानंतर देवा हा लक्ष्मणला सतत फोन करुन दुप्पट रक्कमेविषयी बोलत होता. १८ मेला ते दोघेही पुन्हा मुंबईत आले होते. यावेळी त्यांना देवा हा मरिनड्राईव्ह येथील ट्रायटंड हॉटेलमध्ये भेटला. त्याने त्यांना पुन्हा दुप्पट रक्कमेचे आमिष दाखविले होते. किमान २५ लाख रुपये जमा केल्यास दुप्पट रक्कम मिळतील असे सांगितले होते. त्यानंतर ते तिघेही पवईतील हिरानंदानी हॉस्पिटलजवळ आले होते. तिथे त्यांच्यात पुन्हा दुप्पट रक्कमेविषयी चर्चा झाली होती. उद्या २५ लाख रुपये घेऊन या आणि ५० लाख रुपये घेऊन जा असे त्याने सांगितले. त्यामुळे ते दोघेही शनिवारी २५ लाख रुपये घेऊन मरिनड्राईव्ह येथे आले. त्यांनी देवाला २५ लाख रुपये आणल्याचे सांगितले. त्यानंतर त्याने त्यांना पवईतील हिरानंदानी हॉस्पिटलजवळ बोलाविले. तिथे त्यांना दुप्पट रक्कम मिळेल असे सांगितले.

पवई येथे आल्यानंतर देवाने त्यांच्याकडील २५ लाखांची कॅश घेतली. ही कॅश एका कारमधून ठेवून कारमधून दुसरी बॅग घेऊन त्यांना दिली. त्यात पैसे असल्याचे खात्री होताच त्याने एका व्यक्तीला इशारा केला. काही वेळानंतर तिथे एक टॅक्सी आली. त्यानंतर ते दोघेही कॅश डिक्कीत ठेवून टॅक्सीत बसले. काही अंतर गेल्यानंतर ते दोघेही टॅक्सीतून उतरले. टॅक्सीचालकाला भाड्याचे शंभर रुपये देत असताना तो टॅक्सी घेऊन तेथून पळून गेला. त्यांनी त्याचा पाठलाग केला, मात्र तो पळून जाण्यात यशस्वी झाला. या घटनेनंतर त्यांनी देवाला फोन करुन घडलेला प्रकार सांगितला. यावेळी देवाने तुमचे दुप्पट रक्कम उद्यापर्यंत मिळतील, पोलिसांत तक्रार करु नका असे सांगून फोन कट केला. मात्र दोन दिवस उलटूनही देवा दुप्पट रक्कम घेऊन आला नाही. फसवणुकीचा हा प्रकार उघडकीस येताच पोपट गांधी यांनी पार्कसाईट पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. त्यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी देवासह त्याच्या सहकार्‍याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पवई ते विक्रोळी परिसरातील सीसीटिव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले असून या फुटेजवरुन आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page