एल ऍण्ड टी फायनान्स गुंतवणुकीच्या बहाण्याने फसवणुक
निवृत्त पोस्टमास्तरला गंडा घालणार्या महिलेविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
८ सप्टेंबर २०२४
मुंबई, – एल ऍण्ड टी फायनान्सच्या आकर्षक योजनेत गुंतवणुक केलेल्या रक्कमेवर तीन वर्षांत दुप्पट रक्कम मिळेल अशी बतावणी एका ६३ वर्षांच्या निवृत्त वरिष्ठ पोस्टमास्तरची त्यांच्याच परिचित महिलेची सुमारे पंधरा लाखांची फसवणुक केल्याचा प्रकार विलेपार्ले परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी भारती ब्रिजमोहन भूषण या महिलेविरुद्ध विलेपार्ले पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. भारतीने गुंतवणुक केलेली रक्कम वेयक्तिक कामासाठी वापरुन ही फसवणुक केली, पैशांची मागणी केल्यानंतर तक्रारदारांवर मानसिक शोषण केल्याची जुहू पोलिसांत बोगस तक्रार केली होती. गुंतवणुकीच्या आमिषाने तिने इतर काही लोकांची फसवणुक केली आहे का याचा पोलीस तपास करत आहेत.
श्रीपत नारायण रेवगडे हे विलेपार्ले येथील शहाजी राजे मार्गावर त्यांच्या कुटुंबियांसोबत राहतात. ते वरिष्ठ पोस्टमास्तर म्हणून निवृत्त झाले असून त्यांची पत्नीही पोस्टात निवृत्त झाल्या आहेत. भारती ही त्यांच्या परिचित असून गेल्या पंधरा वर्षांपासून ते एकमेकांना ओळखतात. भारतीय ही न्यू पनवेल येथे राहत असून पूर्वी पोस्टल एजंट म्हणून काम करत होती. २०२० साली पोस्टातून निवृत्त झाल्यानंतर श्रीपत रेवगडे यांना ग्रॅज्युयटीचे आठ लाख रुपये मिळाले होते. ही रक्कम त्यांना पोस्टात वरिष्ठ नागरिकासाठी असलेल्या खात्यात गुंतवणुक करायची होती. याच दरम्यान भारती ही त्यांच्या घरी आली होती. तिने ती एल ऍण्ड टी फायनान्स कंपनीत कामाला असल्याचे सांगून त्यांच्या कंपनीने अनेक आकर्षक योजना सुरु केल्या आहेत. त्यातील एका योजनेत पैसे गुंतवणुक केल्यास त्यांना तीन वर्षांत गुंतवणुक केलेली रक्कम दुप्पट मिळेल असे सांगून त्यांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला होता. तिच्यावर विश्वास ठेवून त्यांनी तिच्याकडे सुरुवातीला तीन वर्षांसाठी पाच लाखांची गुंतवणुक केली होती. काही महिन्यानंतर त्यांनी तिच्याकडे स्वतसह पत्नीच्या नावाने आणखीन दहा लाखांची गुंतवणुक केली होती. या गुंतवणुकीचे कागदपत्रे एका आठवड्यात देते असे भारतीने सांगितले होते, मात्र काही महिने उलटूनही तिने ते कागदपत्रे त्यांना दिले नाही.
हा प्रकार संशयास्पद वाटल्याने त्यांनी तिला जाब विचारला होता. यावेळी तिने त्यांनी दिलेले पंधरा लाख रुपये कंपनीत गुंतवणुक न करता वैयक्तिक कामासाठी खर्च केल्याची कबुली दिली. ही माहिती ऐकून त्यांना प्रचंड मानसिक धक्का बसला होता. त्यामुळे त्यांनी तिच्याकडे गुंतवणुक केलेल्या पैशांची मागणी सुरु केली होती. मात्र तिने पैसे परत केले नाही. तिने तिच्या फ्लॅट विक्रीतून पैसे देण्याचे आश्वासन दिले, मात्र ते आश्वासन तिने पाळले नाही. सतत पैशांची मागणी करुन श्रीपत रेवगडे हे तिचा मानसिक शोषण करत असल्याचा आरोप करुन तिने त्यांच्याविरुद्ध जुहू पोलिसांत तक्रार केली होती. त्यामुळे त्यांनी तिच्याविरुद्ध विलेपार्ले पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर भारतीय भूषणविरुद्ध पोलिसांनी ४०६, ४२० भादवी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून लवकरच भारतीची पोलिसांकडून चौकशी होणार आहे.