दुप्पट रक्कमेसह चांगल्या परताव्याचे गाजर दाखवून 1.46 कोटीची फसवणुक

शासकीय अधिकारी असल्याची बतावणी अनेकांना घातला गंडा

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
24 मार्च 2026
मुंबई, – शासकीय योजनेत गुंतवणुक केल्यास दुप्पट रक्कमेसह चांगल्या परताव्याचे गाजर दाखवून एका मायलेकांनी 1 कोटी 46 लाख रुपयांची फसवणुक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. प्रतिक काला आणि त्रिशाल काला अशी या आरोपी मायलेकाचे नाव आहे. यातील प्रतिकने तो भारत सरकारच्या फॉरेन आणि ट्रेड विभागातील वरिष्ठ अधिकारी असल्याची बतावणी करुन तक्रारदार महिलेसह अनेकांना गंडा घातल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. याच गुन्ह्यांत दोघांनाही पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून चौकशीनंतर या दोघांवर अटकेची कारवाई होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

सोनिया राजेश जेस्वानी ही 47 वर्षांची महिला व्यावसायिक असून तिचा लेडीज गारमेंटचा व्यवसाय आहे. सध्या ती तिच्या कुटुंबियांसोबत अंधेरीतील लोखंडवाला संकुल परिसरात राहते. याच परिसरात तिच्या मालकीचे एक लेडीज गारमेंट शॉप आहे. गेल्या वर्षी ऑक्टोंबर महिन्यांत तिची आरोपी प्रतिक काला अणि तिची आई त्रिशाल काला यांच्याशी ओळख झाली होती. यावेळी प्रतिकने तो सरकारी अधिकारी असल्याचे सांगून सध्या भारत सरकारच्या फॉरेन अ‍ॅण्ड ट्रेड विभागात वरिष्ठ अधिकारी म्हणून कार्यरत असल्याचे सांगितले. त्यांचा विश्वास बसावा म्हणून त्याने भारताचे राजमुद्रा असलेले व्हिजिटिंग कार्ड दाखविण्याचा प्रयत्न केला होता.

याच दरम्यान त्याने त्यांना भारत सरकारने त्यांच्या फॉरेन आणि ट्रेडमध्ये अनेक गुंतवणुक योजना सुरु केल्या आहेत. या योजनेत गुंतवणुक केल्यास त्यांना चांगला फायदा होईल. त्यात आतापर्यंत अनेकांनी गुंतवणुक केली असून त्यांना चांगला फायदा झाला आहे. सरकारी योजना असल्याने त्यात फसवणुकीचा कुठलाही धोका नाही असे सांगून त्यांना गुंतवणुक करण्यास प्रवृत्त केले होते. इतकेच नव्हे तर बोनांन्झ योजनेत गुंतवणुक केल्यास अल्पवधीत गुंतवणुक रक्कम दुप्पट मिळेल असे भासवून त्यांचा विश्वास संपादन केला होता. अल्पवधीत गुंतवणुक रक्कम दुप्पट मिळत असल्याने सोनिया जेस्वानी यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांनी, नातेवाईक तसेच मित्रमंडळींनी त्यांच्यावर विश्वास ठेवून विविध योजनेत 1 कोटी 46 लाख 34 हजार रुपयांची गुंतवणुक केली होती.

मात्र या गुंतवणुकीवर कोणालाही चांगला परतावा किंवा दुप्पट रक्कम मिळाली नाही. याबाबत त्यांनी त्यांच्याकडे विचारणा सुरु केली होती, मात्र त्यांच्याकडून त्यांना प्रतिसाद मिळत नव्हता. ते दोघेही त्यांना वेगवेगळे कारण सांगून टाळण्याचा प्रयत्न करत होते. हा प्रकार संशयास्पद वाटताच सोनिया जेस्वानी यांनी प्रतिकसह त्याची आई त्रिशाल काला यांची चौकशी सुरु केली होती. यावेळी तिला प्रतिकचा भारत सरकारच्या फॉरेन आणि ट्रेड विभागाशी काहीही संंबंध नव्हता. तो तिथे नोकरी करत नव्हता. शासकीय अधिकारी असल्याची बतावणी करुन त्याच्यासह त्याच्या आईने सोनिया जेस्वानी यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांना, नातेवाईक आणि मित्रमंडळींना विविध योजनेत चांगला परतावा तसेच दुप्पट रक्कमेचे गाजर दाखवून फसवणुक केली होती.

या दोघांनी आतापर्यंत अनेकांकडून 1 कोटी 46 लाख 34 हजार रुपये घेऊन या रक्कमेचा परस्पर अपहार करुन त्यांची फसवणुक केली होती. हा प्रकार लक्षात येताच सोनिया जेस्वानी यांनी ओशिवरा पोलीस ठाण्यात धाव घेऊन तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. तिच्या तक्रार अर्जावरुन पोलिसांनी प्रतिक काला आणि तिची आई त्रिशाल काला या दोघांविरुद्ध शासकीय कर्मचारी असल्याची बतावणी करुन पैशांचा अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून या दोघांनी अशाच प्रकारे इतर काही लोकांची फसवणुक केली आहे का याचा पोलीस तपास करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page