दुप्पट रक्कमेसाठी नातेवाईकांकडून कर्ज घेऊन फ्लॅटची विक्री केली
गुंतवणुकीच्या नावाने वयोवृद्ध डॉक्टरची ८० लाखांची फसवणुक
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
७ मार्च २०२४
मुंबई, – गुंतवणुकीच्या नावाने एका ६५ वर्षांच्या वयोवृद्ध डॉक्टरची सुमारे ऐंशी लाख रुपयांची फसवणुक झाल्याचा प्रकार कुर्ला परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी डॉक्टरच्या तक्रारीवरुन कुर्ला पोलिसांनी शरीयर मुस्ताक छत्रीवाला ऊर्फ शोएब एम. मेमन या भामट्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. दुप्पट रक्कमेसाठी तक्रारदार डॉक्टर नातेवाईकांकडून कर्ज घेऊन, स्वतचे फ्लॅटची विक्री करुन ऐंशी लाखांची गुंतवणुक केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. दरम्यान आरोपी शोएब गुन्हा दाखल होण्यापूर्वीच पळून गेल्याने त्याचा पोलिसाकडून शोध सुरु आहे.
मूळचे नाशिकचे रहिवाशी असलेले धनशाम किशोरीलाल वर्मा हे व्यवसायाने डॉक्टर आहेत. त्यांच्यासोबत त्यांची पत्नी आणि मुलगा राहत असून ते अँक्युपक्चरीस्ट तंज्ञ आहेत. २०१८ साली ते गोरेगाव परिसरात राहत होते. त्या वेळेस विविध रुग्णांच्या घरी जाऊन त्यांच्यावर उपचार करत होते. याच दरम्यान त्यांना अज्ञात व्यक्तीने फोन करुन त्याना तुमचे पैसे डबल करायचे असेल तर माझयाकडे तुमच्यासाठी एक चांगली योजना आहे. तुम्हाला गुंतवणुक करायची असेल तर मला नक्की भेटा, त्यात तुमचा फायदा आहे असे सांगितले. या व्यक्तीने त्यांना कुर्ला येथील न्यू मिल रोड, सायबर पॅलेससमोर भेटायला बोलाविले होते. तिथे गेल्यानंतर त्यांची शोएब मेमनशी ओळख झली होती. त्याने त्यांना विविध गुंतवणुक योजनेची माहिती देताना त्यात गुंतवणुक केल्यास त्यांना चांगला परवाता मिळेल असे सांगितले होते. त्याच्या आमिषाला बळी पडून त्यांनी त्याच्याकडील विविध गुंतवणुक योजनेत ऑनलाईनसह पेटीएम, मनी ट्रान्स्फर, फोन पे, आरटीजीएसच्या माध्यमातून सुमारे ८० लाखांची गुंतवणुक केली होती. त्याला पैसे देण्यासाठी त्यांनी त्यांच्या नातेवाईकांकडून काही रक्कम उसने घेतले होते. इतकेच नव्हे तर त्यांच्या फ्लॅटची विक्री करुन त्यात गुंतवणुक केली होती.
या डबल रक्कमेतून त्यांना नवीन फ्लॅट खरेदी करायचा होता. मात्र दिलेल्या मुदतीत शोएबने मुद्दलसह व्याजाची रक्कम परत केली नाही. त्यामुळे ते प्रचंड आर्थिक अडचणीत सापडले होते. वारंवार विनंती करुनही त्याने त्यांना पैसे परत केले नाही. उलट तोच व्याजासहीत मुद्दल रक्कम परत करण्यासाठी त्यांच्याकडे आणखीन पैशांची मागणी करत होता. फसवणुकीचा हा प्रकार उघडकीस येताच त्यांनी कुर्ला पोलिसांना घडलेला प्रकार सांगून तिथे शोएबविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदविला आहे. प्राथमिक तपासात शोएब हा कुर्ला येथे राहत असून त्याचे खरे नाव शरीयर मुस्ताक छत्रीवाला असे आहे. त्याने अशाच प्रकारे अनेकांना दुप्पट रक्कमेचे आमिष दाखवून त्यांची फसवणुक केल्याचे बोलले जाते. शोएब हा पळून गेल्याने त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.