दुप्पट रक्कमेसह जास्त परताव्याच्या आमिषाने 32 लाखांची फसवणुक

खाजगी कंपनीच्या मालकाविरुद्ध मालकासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
22 फेब्रुवारी 2026
मुंबई, – गुंतवणुक रक्कमेवर जास्त परतावा तसेच गुंतवणुक रक्कम दुप्पट देण्याचे आमिष दाखवून काही गुंतवणुकदारांची सुमारे 32 लाखांची फसवणुक झाल्याचा प्रकार बोरिवली परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी मेसर्च ग्लोबल अ‍ॅक्टिव्ह कंपनीच्या दोन मालकासह तिघांविरुद्ध कस्तुबा मार्ग पोलिसांनी भारतीय न्याय सहिता आणि महाराष्ट्र ठेवीदाराच्या अधिनियम कायदा कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. शामली सुनिल घाडीगावकर, प्रविण म्हात्रे ऊर्फ प्रविण देसाई, महेश जाधव ऊर्फ महेश पाटील ऊर्फ अजय राठोड ऊर्फ अजय जाधव अशी या तिघांची नावे आहेत. तिन्ही आराोपी पळून गेल्याने त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. फसवणुकीची आताची रक्कम 32 लाख रुपये असली तरी हा आकडा आणखीन वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

जितेंद्र शिवाजी डोके हे भायखळा येथे राहत असून त्यांचा भाजी सप्लाय करण्याचा व्यवसाय आहे. 10 ऑक्टोंबर 2025 रोजी त्यांना सोशल मिडीयावर ग्लोबल अ‍ॅक्टिव्ह कंपनीची एक शेअरमार्केटसंदर्भातील एजंट आणि कस्टमर इन्वेस्टमेंट बेनीफिटची जाहिरात दिसली होती. त्यात वीस हजार ते दहा कोटीपर्यंत गुंतवणुक केल्यास प्रत्येक महिन्याा सहा ते चाळीस टक्के प्रॉफिट मिळेल तसेच दरमहा आकर्षक नफा-दुप्पट रक्कम मिळेल असे नमूद केले होते. त्यामुळे त्याने जाहिरातीमधील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला होता. यावेळी स्वप्नील खाडे या व्यक्तीने तो कंपनीचा कर्मचारी असल्याचे सांगितले होते.

ही कंपनीत शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणुक करत असून त्यात कंपनीला अल्पावधीत जास्त व्याजासह दुप्पट रक्कम मिळते. त्याचा फायदा कंपनी त्यांच्या गुंतवणुकदारांना करुन देते असे सांगितले. त्यामुळे जितेंद्र डोके हे बोरिवलीतील दौलतनगर, गुरुकृपा हाऊसमधील कंपनीच्या कार्यालयात गेले होते. तिथे त्यांची एक्झिक्युटिव्ह सेल्स ऑफिसर स्वप्निलशी भेट झाली होती. तिथे दहाहून अधिक महिला आणि पुरुष कामाला होते. त्याने कंपनीचे प्रविण म्हात्रे आणि महेश पाटील हे मालक असल्याचे सांगितले. शामली घाडीगावकर ही वरिष्ठ अधिकारी असून तिला वेगवेगळ्या व्यावसयिक संस्थेकडून बिझनेस वुमन म्हणून पुरस्कार मिळाल्याचे फोटो दाखवून त्यांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला.

त्यानंतर त्याने कंपनीच्या विविध शेअर गुंतवणुकीची माहिती दिली होती. या योजनेत गुंतवणुक केल्यस त्यांना एक ते दोन वर्षांत दुप्पट रक्कम मिळेल असे सांगितले. त्यात कुठलाही धोका नसून कंपनीने सर्व गुंतवणुकदारांना खात्रीने पैसे देत असल्याचा दावा केला होता. गुंतवणुकीनंतर कंपनीकडून पाचशे रुपयांच्या बॉण्ड पेपर नोटराईज केलेली प्रॉमिसरी नोट, गुंतवणुक केलेल्या रक्कमेचे रिसीट, कंपनीचे कागदपत्रे आणि गुंतवणुक केलेल्या मूळ रक्कमेचा पीडीसी धनादेश देत असल्याचे सांगितले. या आमिषाला बळी पडून त्यांनी कंपनीत सहा लाखांची गुंतवणुक केली होती. या गुंतवणुकीवर त्यांना कंपनीने 84 हजार रुपयांचे व्याजाची रक्कम दिली होती. ही रक्कम त्यांच्या बँक खात्यात ट्रान्स्फर झाली होती.

जानेवारी 2026 रोजी त्यांच्या बँक खात्यात व्याजाची रक्कम आली नाही म्हणून त्यांनी स्वप्निलला संपर्क साधला होता. मात्र त्याने त्यांना विविध कारण सांगून टाळण्याचा प्रयत्न केला होता. काही दिवसांनी ते कंपनीच्या कार्यालयात गेले होते. यावेळी त्यांना तिथे अनेक गुंतवणुकदार जमा झाल्याचे दिसून आले. कंपनीने कार्यालयाला टाळे लावले होते. कंपनीचे मालकासह इतर अधिकारी आणि कर्मचारी पळून गेले होते. तिथे उपस्थित लोकांची चौकशी केल्यानंतर त्यांच्यासह संबंधित गुंतवणुकदारांची सुमारे 32 लाख रुपयांची फसवणुक झाल्याचे दिसून आले. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी कस्तुरबा मार्ग पोलीस ठाण्यात धाव घेऊन तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला.

यावेळी जितेंद्र डोके यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी शामली घाडीगावकर, प्रविण म्हात्रे आणि महेश जाधव या तिघांविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुक, महाराष्ट्र ठेवीदाराच्या अधिनियम कायदा कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आतापर्यंत काही ठराविक गुंतवणुकदारांनी त्यांची 32 लाखांची फसवणुक झाल्याचा दावा केला असला तरी फसवणुकीची रक्कम ही रक्कम कोट्यवधी रुपयांच्या घरात जात असल्याचे बोलले जाते. त्यामुळे कंपनीकडून फसवणुक झालेल्या गुंतवणुकदारांनी कस्तुरबा मार्ग पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page