मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१७ मार्च २०२४
मुंबई, – दुहेरी आत्महत्येच्या घटनेने कांदिवली परिसरात प्रचंड शोककळा पसरली आहे. ६१ वर्षांच्या वयोवृद्ध पतीने त्याच्याच ५७ वर्षांच्या पत्नीसह जीवन संपविले. या दुहेरी आत्महत्येमागील अधिकृत कारण समजू शकले नाही, मात्र आर्थिक चणचणीमुळे आलेल्या मानसिक नैराश्यातून त्यांनी आत्महत्या केल्याचे बोलले जाते. घटनास्थळी पोलिसांना एक सुसायट नोट सापडली असून त्यात त्यांनी आपण स्वखुशीने आत्महत्या करीत असल्याचे नमूद केले आहे. प्रमोद वासुदेव चोणकर आणि अर्पिता प्रमोद चोणकर अशी या पती-पत्नींची नावे असून त्यांच्या फ्लॅटमधून दुर्गधी येऊ लागल्याने या दुहेरी आत्महत्येचा पर्दाफाश झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
प्रमोद चोणकर हे त्यांची पत्नी अर्पिता हिच्यासोबत कांदिवलीतील आर्य चाणक्यनगर, अनुभूती सोसायटीमध्ये राहत होते. त्यांना मूळबाळ नव्हते. ते दोघेही एकांकी जीवन जगत होते. गेल्या दोन ते तीन दिवसांत त्यांना स्थानिक रहिवाशांनी पाहिले नव्हते. हा प्रकार अनेकांना संशयास्पद वाटत होता, त्यातच गुरुवारी त्यांच्या फ्लॅटमधून दुर्गधी येत होती. त्यामुळे स्थानिक रहिवाशांनी ही माहिती समतानगर पोलिसांना दिली होती. या माहितीचे गांभीर्य लक्षात येताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. दरवाजा तोडून आत प्रवेश केल्यानंतर पोलिसांना प्रमोद यांनी नॉयलॉनच्या दोरीने पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसून आले तर त्यांच्याच शेजारी त्यांची पत्नी अर्पिता या मृत अवस्थेत पडल्या होत्या. या दोघांचेही मृतदेह कुजलेले होते. मृतदेह फुगून फुटलेल्या आणि त्यातून किडे पडल्याचे दिसून येत होते. पंचनामा करुन दोन्ही मृतदेह पोलिसांनी शवविच्छेदनासाठी पाठवून दिले होते. प्रमोद यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली होती, मात्र अर्पिताच्या मृत्यूचे अधिकृत कारण समजू शकले नाही. तिने किटकनाशक प्राशन करुन आत्महत्या केली असावी किंवा तिची गळा आवळून नंतर प्रमोद यांनी गळफास लावला होता का याचा पोलीस तपास करत आहेत.
शवविच्छेदन अहवालानंतर तिच्या मृत्यूचे कारण समजू शकेल असे पोलिसांकडून सांगण्यात आले. घटनास्थळी पोलिसांना एक सुसायट नोट सापडली आहे. त्यात मानसिक नैराश्यातून आम्ही आत्महत्या करत आहोत असे प्रमोद यांनी लिहिले होते. प्राथमिक तपासात त्यांना आर्थिक चणचण होती, त्यातून नैराश्यातून त्यांनी जीवन संपविल्याचे बोलले जाते. याप्रकरणी समतानगर पोलिसांनी दोन स्वतंत्र एडीआरची नोंद करुन तपास सुरु केला आहे. या दुहेरी आत्महत्येने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड शोककळा पसरली होती. शवविच्छेदन अहवालानंतर या दुहेरी आत्महत्येचा चौकशी अहवाल वरिष्ठांसह पोलीस उपायुक्त स्मिता पाटील यांना पाठविण्यात येणार असल्याचे एका अधिकार्याने बोलताना सांगितले.