मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
११ एप्रिल २०२४
मुंबई, – डॉक्टरच्या अपॉईटमेंटच्या नावाने एका ५९ वर्षांच्या ऍक्टरची अज्ञात सायबर ठगाने फसवणुक केल्याचा प्रकार अंधेरी परिसरात उघडकीस आला आहे. लिंक पाठवून ऑनलाईन नोंदणी करण्यास प्रवृत्त करुन या ठगाने त्याच्या बॅक खात्यातून ७७ हजाराचा अपहार केला. अपॉईटमेंटसाठी कॉल करणे या ऍक्टरला चांगलेच महागात पडले आहे. याप्रकरणी ओशिवरा पोलिसांनी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून आरोपी सायबर ठगाचा शोध सुरु केला आहे.
इक्बाल मोहम्मद याकूब हे ऍक्टर असून ते अंधेरीतील लोखंडवाला, मिल्लतनगर परिसरात राहतात. २६ मेला ते त्यांच्या घरी होते. त्यांना दादर येथील आर्थेसर्जन डॉ. सुधीर वारियर यांची उपचारासाठी अपॉईटमेंट घ्यायची होती. त्यामुळे त्यांनी सोशल मिडीयावर त्यांचा मोबाईल शोधण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी त्यांना एक मोबाईल क्रमांक सापडला होता. त्यामुळे त्यांनी त्या मोबाईल क्रमांकवर संपर्क साधला होता. यावेळी समेारील व्यक्तीने त्याने त्यांना अपॉईटमेंटसाठी ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यानंतर त्याने त्यांना एक लिंक पाठवून दिली होती. ही लिंक ओपन करुन त्यांनी त्यांची माहिती अपलोड करुन दहा रुपये ट्रान्स्फर करण्याचा प्रयत्न केला. मात्र ही रक्कम ट्रान्स्फर झाली होती. हा प्रकार संशयास्पद वाटताच त्यांनी ती लिंक डिलिट केली. त्यानंतर त्यांच्या मोबाईलवर चार ऑनलाईन व्यवहार झाल्याचे मॅसेज आले होते. त्यात त्यांच्या बँक खात्यातून दोन हजार आणि तीन वेळा पंचवीस हजार रुपये डेबीट झाल्याचे नमूद करण्यात आले होते. ही रक्कम मोघल इंटरप्रायजेस या कंपनीच्या बँक खात्यात ट्रान्स्फर झाले होते. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच त्यांनी ओशिवरा पोलिसांना ही माहिती सांगितली. त्यानंतर त्यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी अज्ञात सायबर ठगाविरुद्ध भादवीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे.