मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२२ नोव्हेंबर २०२४
मुंबई, – कोकेन तस्करीप्रकरणी एका लायबेरीयन नागरिकाला छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर महसुल गुप्तवार्ता संचलनालयाने अटक केली. या कारवाईत या अधिकार्यांनी ३ किलो ४९६ ग्रॅम वजनाचे कोकेन जप्त केले असून त्याची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत सुमारे ३४ कोटी रुपये इतकी आहे. त्याच्याविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. अटकेनंतर त्याला लोकल कोर्टाने चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
गेल्या काही वर्षांत विदेशातून सोने आणि ड्रग्ज तस्करीच्या गुन्ह्यांत लक्षणीय वाढ झाली होती. त्यामुळे केंद्रीय तपास यंत्रणेने अशा तस्कराविरुद्ध विशेष मोहीम हाती घेतली होती. ही मोहीम सुरु असताना विदेशातून मोठ्या प्रमाणात ड्रग्जची तस्करी होणार असल्याची माहिती डीआरआयच्या अधिकार्यांना मिळाली होती. या माहितीनंतर या अधिकार्यांनी आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रत्येक प्रवाशांसह त्यांच्या सामानाची तपासणी सुरु केली होती. याच दरम्यान सिएरा लिओनहून आलेल्या एका प्रवाशाला या अधिकार्यांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्याच्याकडील सामानाची तपासणी केली असता त्याच्या ट्रॉली बॅगेच्या खाली एक वजनदार वस्तू दिसून आले. त्यात या अधिकार्यांना दोन पॅकेट सापडले. फिल्ड टेस्ट किटचा वापर करुन चाचणी केल्यानंतर ते कोकेन असल्याचे उघडकीस आले. ३४९६ ग्रॅम वजनाच्या या कोकेनची किंमत सुमारे ३४ कोटी रुपये होती. हा साठा जप्त करुन या प्रवाशाला या अधिकार्यांनी अटक केली. चौकशीत त्याला कोकेन सिएरा लिओनहून एका व्यक्तीने दिले होते. मुंबईत त्याला ते पॅकेट त्याच्या सहकार्याला द्यायचे होते. मात्र त्यापूर्वीच त्याला या अधिकार्यांनी अटक केली.